नागरी समस्यांवरून आयुक्तांना घेराव 

नागरी समस्यांवरून आयुक्तांना घेराव 

नागपूर - स्मार्ट सिटीची घोषणा करणारे सत्ताधारी नागपूरकरांची तहानही भागवू शकत नाही, असा टोला हाणत शहर कॉंग्रेसने आज अपूर्ण सिमेंट रस्त्यामुळे अपघात, कनक रिसोर्सेस व सायबरटेचा घोळ, मनपा रुग्णालयांचे खासगीकरण, गांधीबाग उद्यानावरून आयुक्तांना घेराव घातला. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. 

शहरातील विविध समस्यांबाबत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेपुढे माठ फोडून निदर्शने करण्यात आली. या वेळी ठाकरे यांनी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवरही तोंडसुख घेतले. निदर्शनानंतर महापौर नंदा जिचकार अनुपस्थित असल्याने शिष्टमंडळाने आयुक्तांकडे मोर्चा वळविला. शहरातील पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करीत ठाकरे यांनी सत्ताधारी नागपूरकरांची तहान भागविण्यात अपयशी ठरल्याचे सांगितले. सिमेंट रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. महापालिका दवाखान्यांचे खासगीकरण केले जात आहे. कनक शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी ठिकठिकाणी कचरा करीत आहे. सायबरटेककडून नागरिकांच्या मालमत्तेचे चुकीचे मूल्यांकन करण्यात आल्याने नागरिकांवर अनेकपटीने मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. आता सायबरटेकच्या कामाची तपासणीसाठी 2 कोटी अतिरिक्त देण्यात येणार असून, नागरिकांच्या पैशाची लूट सत्ताधाऱ्यांनी चालविली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. रस्त्यांवर पडलेल्या बांधकाम साहित्यावरून कारवाईऐवजी अधिकारी वसुली करीत आहे. गांधीबाग उद्यानात नऊ मजली इमारत बांधण्याचा कट येथील नगरसेवकाने रचला आहे, याकडेही ठाकरे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. या वेळी उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, नगरसेवक संजय महाकाळकर, ऍड. अभिजित वंजारी, प्रशांत धवड, दीपक वानखेडे, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, नगरसेवक संदीप सहारे, नगरसेवक रमेश पुणेकर, नगरसेवक मनोज सांगोळे, नगरसेवक नितीश ग्वालबंशी, नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर, देवा उसरे, रमन पैगवार, वासुदेव ढोके, अण्णाजी राऊत, नगरसेविका दर्शनी धवड, स्नेहा विवेक निकोसे, भावना लोणारे, रष्मी धुर्वे, नेहा राकेश निकोसे, उज्ज्वला बनकर, हर्षला साबळे, सरस्वती सलामे, ऍड. रेखा बाराहाते, सेवादलचे शहराध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, भोला कुचनकर, ऍड. अक्षय समर्थ, ऍड. रवी नायडू, प्रवीण सांदेकर, विनोद नागदेवते, राजभाऊ चिलाटे, सुनील दहीकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेत्याची वेगळी चूल 
शहर कॉंग्रेसच्या आंदोलनाकडे पाठ फिरविणारे महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दहा-बारा कार्यकर्त्यांनी घेऊन महापौरांच्या कक्षात माठ फोडले. शहर कॉंग्रेसच्या आंदोलनात सहभागी होण्याचा मोठेपणा न दाखविता वनवे यांनी आंदोलनाबाबतही वेगळी चूल मांडत पक्षाचे धिंडवडे काढल्याची चर्चा महापालिकेत यानिमित्त रंगली. विशेष म्हणजे महापौर नसल्याची जाणीव असतानाही त्यांच्या कक्षात माठ फोडण्याचे औचित्य काय? असा टोलाही अनेकांनी वनवे यांना लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com