आयटीआयच्या स्थितीवर संतापली समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नागपूर - विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या इंदोरा येथील आयटीआयला भेट दिली. येथील स्थिती पाहून समितीला चांगलाच संताप आला. त्यांनी प्राचार्यांना चांगलेच फैलावर घेतले. दुरवस्थेसंदर्भात कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करीत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष हरीश पिंपळेंनी प्राचार्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

नागपूर - विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या इंदोरा येथील आयटीआयला भेट दिली. येथील स्थिती पाहून समितीला चांगलाच संताप आला. त्यांनी प्राचार्यांना चांगलेच फैलावर घेतले. दुरवस्थेसंदर्भात कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करीत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष हरीश पिंपळेंनी प्राचार्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

आयटीआयमध्ये बौद्ध, नवबौद्ध धम्मतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. हरीश पिंपळे यांच्यासह आमदार मिलिंद माने, प्रकाश गजभिये, प्रा. जोंगेंद्र कवाडे, राजू तोडसाम, गौतम चाबुकस्वार, डी. अहिरे आदी सकाळच्या सुमारास इंदोरा येथील शासकीय आयटीआय येथे पोहोचले. समितीला संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य दिसले. विशेष समिती येणार असल्याने साफसफाई सुरू करण्यात आली. मात्र समिती सकाळीच दाखल झाल्याने त्यांना हे चित्र दिसले. प्राचार्य आणि शिक्षकांच्या खोल्या निटनेटक्‍या होत्या. 

वर्गखोल्यांची मात्र दुरवस्था होत्या. वर्गखोल्या पाहून अध्यक्ष आणि सदस्य चांगलेच संतापले. विद्यार्थी येथे शिक्षण घेतात कसे, असाच सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधींचे साहित्य तीन वर्षांपूर्वी मंजूर झाले असून, सर्व साहित्य धूळखात पडत असल्याचे दिसले. शौचालयही मोडकळीस आल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या निधीचा चुराडा होत असल्याचे पाहून अध्यक्ष आणि सदस्यांनी प्राचार्यांना खडे बोल सुनावल्याची माहिती आहे. 

विद्यापीठाला भेट
समितीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालाही भेट दिली. येथील पदभरती आणि बिंदुनामावलीची माहिती घेतली. बिंदुनामावलीची माहिती योग्यरित्या ठेवली नसल्याचे निदर्शनात आले. विद्यापीठाने महिन्याभरात बिंदुनामावली अद्ययावत करून सादर करण्याचे आश्‍वासन दिले.

समाजल्याणच्या कामावर समाधान
समितीने समाजकल्याणच्या कामावर समाधान व्यक्त केले. समितीने चोखामेळा, वानाडोंगरी वसतिगृहाला भेट देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चोखामेळा संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती असल्याने त्यांनी संपूर्ण वसतिगृहाची पाहणी केली. येथील सोयीसुविधांसदर्भात समाधान व्यक्त केले. वानाडोंगरीच्या वसतिगृहासंदर्भात तर त्यांनी प्रशंसा करीत उत्तम असा शेरा दिला. अशी व्यवस्था सर्वच वसतिगृहांची ठेवण्याच्या सूचना केली. विद्यार्थ्यांनीही वसतिगृहाच्या सोयीबाबत समाधान व्यक्त करीत शिष्यवृत्तीचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला. त्याचप्रमाणे स्नेहसंमेलनासाठी देणाऱ्या निधीत वाढ करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे समिती उमरेड येथील घरकुलाची पाहणी केल्याची  माहिती आहे.

Web Title: nagpur news iti condition