कालिदास महोत्सव यंदा नागपुरातच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कालिदास स्मारक आणि नगरधननंतर यंदा कुंवारा भिवसेन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने जानेवारीमध्ये  आदिवासी नृत्य महोत्सव घेण्यासंदर्भात नियोजन होईल.
- अनुपकुमार, विभागीय आयुक्त

नागपूर - विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा कालिदास महोत्सव यंदा खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने केवळ नागपुरात होणार असल्याचे कळते. नवनिर्मित कविवर्य सुरेश भट सभागृहात नोव्हेंबर महिन्यात तीन दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.

मधली काही वर्षे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा महोत्सव बंद पडला होता. मात्र, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वी कालिदास महोत्सवाला पुनरुज्जीवित केले. याच महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाचे नूतनीकरणही करण्यात आले. २०१५ मध्ये रामटेक येथील कालिदास स्मारक आणि २०१६ मध्ये नगरधन येथील किल्ल्यावर महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा थाटात पार पडला. यंदा तिन्ही दिवसांचा महोत्सव नागपुरातच सुरेश भट सभागृहात होणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाची  औपचारिक घोषणा न करता थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सुरेश भट सभागृहाच्या उद्‌घाटन सोहळ्याचा मुहूर्त साधण्यात आला. नागपुरातील दोन हजार प्रेक्षक सभागृहाच्या उद्‌घाटन सोहळ्याला आले असताना त्यांना कालिदास महोत्सवाचे फलक बघायला मिळाले. माध्यमांमध्ये कुठल्याही चर्चेविना थेट फलक झळकल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटले आणि आनंदही झाला.  १७ ते १९ नोव्हेंबर या काळात सुरेश भट सभागृहात या महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकर दर्दी रसिकांना ‘शास्त्रीय’ मेजवानी मिळणार आहे. कालिदासांचे ‘ऋतुसंहार’ हे काव्य यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. सहा ऋतूंचे वर्णन करणारे हे काव्य आहे. महोत्सवाचे वेळापत्रक निश्‍चित झाले असले तरी कालिदास महोत्सव आयोजन समितीच्या वतीने पुढील महिन्यात त्याची माध्यमांद्वारे घोषणा करण्यात येईल, असे समजते. 

Web Title: nagpur news Kalidas Festival