कामठीला वगळले, इतरांना कायम ठेवले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नागपूर - मेट्रो रिजनच्या आराखड्यात फेरबदल करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कामठी नगरपालिका व परिसरातील ग्रामपंचायती नगरपालिकेसाठी प्रस्तावित असल्याने आराखड्यातून वगळल्याचा दावा अधिकाऱ्यांचा आहे. दुसरीकडे बुटीबोरी, टाकळघाटसह अनेक ग्रामपंचायतींचे प्रस्ताव राज्यशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यांना मेट्रो रिजनमधून का वगळण्यात आले नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

ब वर्गाच्या कामठी नगरपालिकेचा अ वर्गात समावेश केला जाणार आहे. याशिवाय परिसरात कोळसा खाणी आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रामपंचायतींचा दर्जा उंचावण्याचा प्रस्ताव यामुळे कामठीचा संपूर्ण परिसर मेट्रोच्या आराखड्यातून वगळण्यात आल्याचे सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तोच न्याय इतर प्रस्तावित ग्रामपंचायतींना लावण्यात आलेला नाही. बुटीबोरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. तिला नगरपालिका करण्याचा प्रस्ताव आहे. तो राज्यशासनाकडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय लोकसंख्येने मोठी असलेली टाकळघाट ग्रामपंचायतीचाही नगरपालिका करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित असताना आणि राज्यशासनाने अद्याप मंजुरी दिली नसताना मेट्रो रिजनच्या आराखड्यातून कामठी ग्रामपंचायतीचे क्षेत्र वगळण्यात आले तर इतर प्रस्तावितांचे क्षेत्र वगळणे आवश्‍यक होते. मात्र, तसे करण्यात आले नाही. वजनदार नेत्यांचेच क्षेत्र आराखड्यातून वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. राज्यशासनाने आराखड्यातून क्षेत्र वगळताना किंवा कायम ठेवताना एकसमान निकष ठेवणे आवश्‍यक होते.  मात्र, हा आपला आणि तो दुसऱ्याचा या निकषावर फेरबदल करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हिंगणा नगरपालिकेला आराखड्यातून वगळण्यात आले असले तरी कामठीप्रमाणे संपूर्ण परिसराला  वगळले नाही. शेजारची गावे आराखड्यात कायम ठेवण्यात आली आहेत. हिंगणा परिसरातही कोळसा खाणीचे क्षेत्र आहे. याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले.

ज्या ग्रामपंचायतीचे नगरपालिकेसाठी प्रस्ताव आहेत त्या सर्वांना सरसकट आराखड्यातून वगळले असते तर प्रश्‍न निर्माण झाले नसते. काही अपवाद वगळता लोकसंख्येने मोठ्या असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींचे नगरपालिकेसाठी प्रस्ताव आहेत. कामठीसाठी जो नियम लावला तो इतर ग्रामपंचायतींसाठी का लावण्यात आला नाही? असा सवाल संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: nagpur news kamthi metro region