नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शहरातील अनुयायांच्या रॅली संविधान चौकात आल्या. शासनाविरोधात नारेबाजीही करण्यात आली. हातात पंचशील ध्वज घेऊन घोषणा देताना कार्यकर्ते.
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शहरातील अनुयायांच्या रॅली संविधान चौकात आल्या. शासनाविरोधात नारेबाजीही करण्यात आली. हातात पंचशील ध्वज घेऊन घोषणा देताना कार्यकर्ते.

बंद, आक्रोश, संयम

नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि शताब्दी, मेडिकल चौक, गोकुळपेठेसह दुकाने बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यानी टायर जाळून आक्रोश व्यक्त केला. आंदोलकर्त्यांचा आक्रोश दाबण्यासाठी तसेच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी काहीवेळा बळाचा वापर केला. आंदोलनकर्त्यांनी कामठी मार्गावर आठ बसेसवर दगडफेक करून फोडण्यात आल्या. दुपारनंतर मात्र संयम बाळगून शांततेत बंद पाळला. इंदोरा परिसरात पुन्हा सायंकाळी दगडफेक सुरू झाली. यामुळे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. या बंदची विशेषता अशी की, महिला आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
शहराचे हृदय असलेल्या झीरो माइल्सपासून, तर शहर सीमेवरील कामठी, दिघोरी, हिंगणा, बेसा, बेलतरोडी या प्रवेशद्वारनजीकचे सारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरले होते.

व्हेरायटी चौकातील मल्टिप्लेक्‍स, सिनेमाघराच्या खिडकीपासून तर शहरातील सीताबर्डी, गोकुळपेठ, महाल, गांधीबाग, मेडिकल चौक, खामला, अंबाझरी अशा बाजारपेठांमधील दुकानांचे शटर दुपारी बारानंतर बंद होते.

बॅंकांसह शाळा, महाविद्यालयापासून शिकवणी वर्गालाही टाळे होते. 
कोरेगाव-भीमा घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. ३) महाराष्ट्रात बंद पाळण्याचे आवाहन केले. मात्र, त्यापूर्वीच नागपुरातील विविध राजकीय पक्ष, फुले-आंबेडकरी विचारांच्या संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच ओबीसी, मराठा बांधवांच्या सामाजिक संघटना या बंदमध्ये सामील झाल्या होत्या. 

सकाळी आठ वाजता शहरात बंदचा परिणाम नव्हता. परंतु, सूर्य माथ्यावर येत होता, तसतसा बंदचा परिणाम जाणवू लागला. नागपूर जिल्ह्यातील कामठीसह विविध भागांत आठ बसेस फोडल्या असून एसटीच्या ५५० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. दक्षिण नागपुरातील शताब्दी चौकातून सकाळी साडेआठ वाजता आंदोलकांनी टायर जाळून येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांचा ताफा पोहोचताच कार्यकर्ते बिथरले. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी बंद पाळला. तुकडोजी चौकातून हजारावर तरुण, तरुणी महिलांच्या जमावाने संपूर्ण मानेवाडा रोड बंद पाडला. इंदोरा चौक, मानेवाडा, शताब्दी तसेच शहरातील प्रत्येक चौकातून रॅली काढून पक्षाच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे तसेच एसटीची वाहतूक रोखून धरली. नागपूर शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्यामुळे बंददरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था आटोक्‍यात होती. 

शहरबस, एसटीची चाके थांबली 
सकाळी साडेसहापासून तर सकाळी साडेदहा-अकरा वाजेपर्यंत शहरात स्टारबसच्या फेऱ्या नियमित सुरू झाल्या. परंतु शताब्दीनगरमध्ये रस्त्यावर टायर जाळल्यानंतर या भागातील फेऱ्या बंद करण्यात आल्या. यानतंर हळूहळू सर्वच परिसरातील स्टारबस फेऱ्या बंद करण्यात येत होत्या. मात्र दुपारी १२ वाजेनंतर शहरात स्टारबसच्या फेऱ्या दिवसभरासाठी बंद करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले. सकाळी दहानंतर गणेशपेठेतील एसटी स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस बंद ठेवल्या. दर पंधरा मिनिटांनी सावनेर, अमरावती, भंडारा, उमरेड, चंद्रपूर शहरात एसटी बसस्थानकावरून एसटी गाड्या सोडण्यात येतात. दिवसभरात एसटीच्या १००६ फेऱ्या होतात. परंतु सकाळच्या प्रहरी झालेल्या साडेचारशे फेऱ्यानंतर पुढे एकही एसटीची फेरी झाली नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५५० एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या. या सर्व फेऱ्या गणेशपेठ, मोरभवन येथून सोडण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. 

ॲम्बुलन्सला रस्ता, तर औषध दुकाने खुली
इंदोरा चौकात आंदोलन ऐन जोमात आले असताना अचानक सु...सु.. आवाज करीत रुग्णवाहिका रस्त्यावरून येत असल्याचे कार्यकर्त्यांना दिसले. सारे आंदोलनकर्ते कार्यकर्ते एका बाजूला झाले. रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. रुग्णवाहिका गेल्यानंतर आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले. याचप्रकारची माणुसकी मेडिकल चौकातही आंदोलनकर्त्यांकडून दिसून आली. मेडिकल चौकात आंदोलनामुळे औषधांची दुकाने बंद होत असल्याचे दिसून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी औषधांची दुकाने बंद करू नका, असा सौजन्याचा सल्ला दिला. याशिवाय मानेवाडा रोडवर आंदोलन सुरू असताना महिलेस भोवळ येऊन खाली पडली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने ऑटोतून तिला मेडिकलमध्ये पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला.   

आपली बस फोडली
आंदोलकांनी महापालिकेच्या आपली बसवर दगडफेक केली. प्रामुख्याने कामठी भागात बस फोडल्याने महापालिकेने सर्व फेऱ्या थांबवून दिल्या. एकूण आठ बसचे यात नुकसान झाले. दिवसभर बस बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. 

कार्यकर्त्यांचे ध्येय एकच, बंद... बंद
आंबेडकरी समाज विखुरला आहे, हे साऱ्यांना ठाऊक असताना कोरेगाव भीमा घटनेनंतर मात्र विविध पक्ष, सामाजिक संघटना, सांस्कृतिक संस्थांतील सारेच कार्यकर्ते एकमताने एकदिलाने आंदोलनात सहभागी झाले. नेते विखुरले असले तरी जनता संघटित असून आंदोलनाची धार दाखवण्यासाठी एकमेकाशी संवाद न साधणारे सारेच कार्यकर्ते आंदोलनात एकत्र दिसत होते. यात बुद्धिवादी होते, कर्मचारी होते, प्राध्यापक होते तर विद्यार्थीही मोठ्या संख्येने आंदोलनात होते. डॉ. भाऊ लोखंडे, डॉ. प्रदीप आगलावे, रमेश शंभरकर, ई. झेड खोब्रागडे, प्रा. प्रतीक बनकर, इ. मो. नारनवरे, ताराचंद्र खांडेकर, अतुल खोब्रागडे, मिलिंद पखाले, सुधीर भगत असो की अलका कांबळे, प्रकाश गजभिये; सारे विखुरलेली मने असली तरी, कार्यकर्त्यांचे आज बंद यशस्वी करणे हे एकच ध्येय दिसत होते. उत्तर नागपुरात नागोराव जयकर दिसत होते, तर मध्य नागपुरात उत्तम शेवडेही दिसले. काँग्रेसचे त्रिशरण सहारे आंदोलनात रस्त्यावर होते. आठवले गटाचे राजन वाघमारे तर गवई गटाचे प्रकाश कुंभे होते. नरेश वहाणे तर जयंत टेंभुरकरही दिसले.

चळवळीतील थेट बोलणारे ॲड. संजय पाटील तर दुसरीकडे रिपाइंचे अमृत गजभिये रस्त्यावर येऊन आंदोलन केले. आठवले गटाचे भीमराव बनसोड तर पीपल्स रिपब्लिकन गोपीचंद ढोके बंदच्या रणांगणात होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्‍याम काळे होते. तर जयदीप कवाडे, संदीप नंदेश्‍वर, भीमराव बनसोड, भूपेश थुलकर, बबन बोंदाडे, दिलीप पाटील सारेच आंदोलनात सामील झाले होते.

कधीही बंद न होणारा खामला बंद
खामला परिसरात भारिप बहुजन महासंघाचे प्रा. संदीप नंदेश्‍वर, अरुण हाडके, राजू लोखंडे, विशाल गोंडाणे, गोरखनाथ भेले, आनंद बागडे, धर्मपाल वंजारी, एस, एम पाटील, जे. आर. गोडबोले, भीमराव दुपारे, बाळू हरखंडे, किशोर मेश्राम, सरला मेश्राम, दिगांबर चनकापुरे यांच्या नेतृत्वात खामला परिसर बंद करण्यात आला.

महापालिकेच्या आठ बसेस फोडल्या
इंदोऱ्यात दगडफेक
शहरबसची चाके थांबली
पोलिसांचा वस्त्यांमध्ये शिरकाव
एसटीच्या ५५० फेऱ्या रद्द
राज्य राखीव पोलिस दल सज्ज
रिपब्लिकन नेत्यांशिवाय होते आंदोलन
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
टायर जाळून व्यक्त केला आक्रोश 
पोलिसांनी मागवली अतिरिक्त कुमक
तुकडोजी चौकात तैनात केले कमांडो

शाळा, महाविद्यालये बंद
महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यासंदर्भात सूचना जारी करणे आवश्‍यक होते. पंरतु, असे झाले नाही. कार्यकर्त्यांच्या जमावाचा धोका लक्षात घेत संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनीच स्वतः निर्णय घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. काही शाळांमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परंतु काही तासांनंतर शहरातील वातावरण बिघडत असल्याच्या वार्ता कानावर आल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीयीकृत बॅंका बंद होत्या. 

पोलिस व्हॅनवर पेट्रोल 
येथील इंदोरा चौकात जमावाला एकत्र येऊच द्यायचे नाही, अशी भूमिका पोलिसांची होती. यामुळे कार्यकर्त्यांना रोखून धरण्याचा प्रकार होत असल्याचे निदर्शनास येताच आंदोलनकर्ते आक्रमक झाले. यानंतर मात्र जमावाला पांगवण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे दिसताच काही कार्यकर्त्यांनी चक्क पोलिसांच्या मोबाईल व्हॅनवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही कार्यकर्त्यांनीच शांत करीत कार्यकर्त्यांना आवरले. काही ठिकाणी तर आंदोलनकर्त्यांपेक्षा पोलिसांचा ताफा प्रचंड होता. 

टायर जाळून रास्ता रोको
नागपूर बंद करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून सुरुवात केली. शताब्दीनगर, उमरेड रोड, म्हाळगीनगर, इंदोरा, अंबाझरी, गोकुळपेठ, खामला, जयताळ्यासह शहरांतील विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक विस्कळीत करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. दरम्यान, पोलिसांचे वाहन येताच कार्यकर्ते गनिमीकावा खेळल्याप्रमाणे पळून जात होते, असे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकविण्याच्या घटना घडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com