उपराजधानीत भीमसैनिक संतप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नागपूर - भीमा-कोरेगाव येथील शौर्य विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागपुरातील आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. संविधान चौकात तीन तास रास्तारोको केल्यानंतरही भीमसैनिकांचा संताप शांत होत नव्हता. पोलिसांना काही प्रमाणात बळाचा वापर करावा लागला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. 

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते सकाळपासून संविधान चौकात एकत्र आले. दुपारी एक वाजता जसजशी गर्दी होऊ लागले तसे आंदोलनकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले.

नागपूर - भीमा-कोरेगाव येथील शौर्य विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागपुरातील आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. संविधान चौकात तीन तास रास्तारोको केल्यानंतरही भीमसैनिकांचा संताप शांत होत नव्हता. पोलिसांना काही प्रमाणात बळाचा वापर करावा लागला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. 

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते सकाळपासून संविधान चौकात एकत्र आले. दुपारी एक वाजता जसजशी गर्दी होऊ लागले तसे आंदोलनकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले.

पेशवाईचे नवे रूप असल्याचा आरोप करीत, या पेशवाईत सहभागी झालेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार मिलिंद माने यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. युवकांनी घोषणाबाजी करीत संविधान चौक ते आकाशवाणी असा क्रांतिमार्च काढला. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्यापर्यंत निवेदन पोहोचवण्यात येईल, असे कुर्वे यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव परिसरातील दंगलीत दगावलेल्या भीमसैनिकांना ५० लाख रुपये तसेच जखमीला २५ लाख नुकसानभरपाई द्यावी, ज्या भीमसैनिकांची चारचाकी वाहने जाळली, त्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोहर भिडे, विनायक एकबोटे यांच्यासह पतीत पावन संघटनेवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात भन्ते प्रियदर्शी महाथेरो, भन्ते कारुणिको महाथेरो, आंबेडकरवादी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, डॉ. प्रदीप आगलावे, इंजिनिअर विजय मेश्राम, कुलदीप रामटेके, प्रा. प्रवीण कांबळे, तुषार नंदागवळी, मिलिंद खोब्रागडे, प्रीतम बुलकुंडे, राहुलरत्न कांबळे, सम्राट अशोक, अमन कांबळे, राहुल कांबळे, वर्षा श्‍यामकुळे, अमितेश सूर्यवंशी यांचा समावेश होता. 

अशी झाली सुरुवात
संविधान चौकात रास्तारोकोमुळे तीन तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प होती. चौकातून होणारी वाहतूक विविध मार्गांनी वळविण्यात आली. केवळ बंदूकधारी पोलिसांचा ताफा आणि आंदोलन करणारे भीमसैनिक दिसत होते. दोन हजारांवर कार्यकर्ते संविधान चौकात एकाच वेळी दाखल झाले. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात हजेरी लावली. उत्तर नागपुरात भीम चौक, दक्षिण नागपुरातील अजनी, आनंदनगर चौकात आंदोलन झाले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

सीआयडी चौकशी करा - प्रकाश गजभिये 
भीमा-कोरेगाव दगडफेक प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून जातीयवादी संघटनांच्या प्रमुख नेत्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी संविधान चौकात आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. दरम्यान, संविधान चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर काळी पट्टी बांधून मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यात आला.

अलका कांबळे, संतोष नरवाडे, महेंद्र भांगे, विजय गजभिये, अमोल वासनिक, राजेश अघव, अभय बनसोड, गोपी अंभोरे, अनिकेत गायकवाड, अभय बनसोड, विलास मानके, चरणसिंग चौधरी, बबलू ढेरिया, दुर्गादास केवलरामानी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

दोषींवर कारवाई करावी - सुलेखा कुंभारे
भीमा-कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादनासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक केली. ही बाब दुर्दैवी असून, या घटनेची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केली. 

काँग्रेसचे शांततेचे आवाहन
भीमा-कोरेगाव येथील घटना दुर्दैवी आहे. जातीयवादी शक्तींचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले. दलित व मराठा समाजात भांडणे लावून काही जातीयवादी पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. अफावांवर विश्‍वास ठेवू नका, असे सांगून विकास ठाकरे यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

आज महाराष्ट्र बंद - प्रा. जोगेंद्र कवाडे 
हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन चळवळीच्या सर्व संघटना, डावे पक्ष, पुरोगामी संघटना यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची घोषणा केली, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकाद्वारे कळविले. भीमा-कोरेगाव येथील  हल्ल्याचा निषेध करीत हिंदू एकता संघटनेचे नेते तसेच आरएसएसचे मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कवाडे यांनी केली.

Web Title: nagpur news koregaon bhima riot agitation