क्रिशला शोधण्यात ‘रेस्क्‍यू टीम’ अपयशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

खापरखेडा - इंदिरानगर आबादी परिसरात राहणारा पाचव्या वर्गाचा विद्यार्थी क्रिश (ता. २५) शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोलार नदीत पोहायला गेला असताना वाहून गेला. खापरखेडा पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने त्याला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. 

खापरखेडा - इंदिरानगर आबादी परिसरात राहणारा पाचव्या वर्गाचा विद्यार्थी क्रिश (ता. २५) शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोलार नदीत पोहायला गेला असताना वाहून गेला. खापरखेडा पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने त्याला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. 

तुलाराम ढोके प्राथमिक शाळेत शिकणारा क्रिश सुनील धुमान (वय १४, इंदिरानगर, आबादी खापरखेडा) हा शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याच्या तीन-चार मित्रांसह कोलार नदीवर पोहायला गेला होता. यावेळी क्रिशसह सर्व मित्र आपापल्या घराकडे परत आले. मात्र यावेळी परिसरातील महिला गौरी विसर्जन करीत होत्या. महिला पूजेत पैसे विसर्जित करीत होत्या. ही बाब क्रिशच्या लक्षात आली. त्यामुळे तो परत पैसे जमा करण्याच्या हेतूने नदीकडे वळला. यावेळी धो-धो पावसाला सुरुवात झाली. पाण्याचा प्रवाह वाढला. क्रिशने पाण्यात उडी घेताच तो वाहून गेला. या घटनेची माहिती परिसरात पसरली. खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र रात्र झाल्याने त्यांनी शोधमोहिमेला विराम दिला. मात्र यावेळी शासकीय यंत्रणा कुठेही आढळून आली नाही. शनिवारी परत सकाळी खापरखेडा पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या  मदतीने शोधमोहीम राबविली. दरम्यान, क्रिश कुठेही आढळून आला नाही. दुपारनंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग आली. पोलिस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार घटनास्थळावर डेरेदाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन महानगरपालिकेच्या रेस्क्‍यू टीमला आमंत्रित केले. मात्र सायंकाळपर्यंत त्यांनी शोधमोहीम राबविली. मात्र त्यांना क्रिश कुठेही आढळला नाही. क्रिश वाहून जाण्याच्या घटनेला २४ तासांपेक्षा अधिक वेळ झाला.

क्रिश हा आपल्या आजी-आजोबांजवळ राहतो. त्याच्या आईचे राजस्थान राजकोट येथे दुसरे लग्न झाले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी क्रिशची आई खापरखेडा येथे आली होती. क्रिशला शिकवणी वर्गात घालून त्याला गणवेश व पुस्तके घेऊन दिली होती. क्रिश हा एकमेव तिचा आसरा होता. मात्र निसर्गाने तिचा पोटचा गोळा क्षणार्धात हिरावून नेला. त्यामुळे परिसरात सर्वत्र शोककळा पसरली. रविवारी परत सकाळी रेस्क्‍यू ऑपरेशन सुरू होणार असून कोलार नदी ओसंडून वाहत असल्यामुळे क्रिश पाण्याच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला असल्याची शक्‍यता अनेकांनी वर्तविली आहे.

Web Title: nagpur news krish Rescue team