तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी प्रभाग!

प्रवीण धोपटे/राजेश मडावी
शुक्रवार, 14 जुलै 2017

वर्धा - विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन दारूबंदीच्या जिल्ह्यांचा मिळून प्रभाग निर्माण केला जात आहे. या प्रभागात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच अवैध दारू व हातभट्ट्या रोखण्याकरिता स्वतंत्रपणे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची २२ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने १२ जुलै रोजी यासंदर्भातील शासननिर्णय काढला आहे. 

महत्त्वाचे असे की, यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १० जानेवारी २०१७ च्या शासननिर्णयान्वये विविध संवर्गातील २२ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता दिलेली आहे. पुढील टप्प्यात पोलिस विभागातील २२ पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही विभाग मिळून दारूबंदी प्रभागाकरिता ४४ पदे निर्माण होणार आहेत. 

राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा भेट दिली. तेव्हा हे तीन जिल्हे मिळून दारूबंदी कॉरिडॉर करण्याची तसेच यातून दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा उभारण्याची घोषणा केली होती. तसेच या तीन जिल्ह्यांतील दारूबंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्वतंत्र पोलिस अधीक्षकपद निर्माण करण्याचेही सूतोवाच केले होते. या घोषणेचा हा पहिला टप्पा असल्याचे मानले जात आहे.

अशी राहतील पदे... 
दारूबंदी प्रभागाकरिता एक अपर पोलिस अधीक्षक, तीन पोलिस निरीक्षक, सहा पोलिस उपनिरीक्षक, आठ पोलिस शिपाई, चार पोलिस शिपाई (चालक) अशी एकूण २२ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हे पोलिस अधिकारी व कर्मचारी सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या अखत्यारित प्रतिनियुक्तीवर असतील. गृह विभागाचे कार्यासन अधिकारी धीरज अभंग यांच्या स्वाक्षरीने हा शासननिर्णय काढण्यात आला.

Web Title: nagpur news liquor ban