'साहित्यिकांनी जनतेचे न्यायाधीश व्हावे'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नागपूर - ‘अलीकडच्या काळात साहित्य, समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात अढिग्रस्त मानसिकता निर्माण झाली आहे. सुडाचे राजकारण यासाठी कारणीभूत आहे. पण, साहित्यिकाने जनतेच्या न्यायाधीशाची भूमिका बजावली पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि. स. जोग यांनी आज (रविवार) येथे केले. विदर्भ साहित्य संघातर्फे ‘ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

नागपूर - ‘अलीकडच्या काळात साहित्य, समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात अढिग्रस्त मानसिकता निर्माण झाली आहे. सुडाचे राजकारण यासाठी कारणीभूत आहे. पण, साहित्यिकाने जनतेच्या न्यायाधीशाची भूमिका बजावली पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि. स. जोग यांनी आज (रविवार) येथे केले. विदर्भ साहित्य संघातर्फे ‘ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती जीवनव्रती पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

विदर्भ साहित्य संघाच्या ९५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा वाङ्‌मय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे साहित्य संघाच्या बहुप्रतीक्षित अशा नव्या सभागृहातील हा पहिलाच कार्यक्रम होता. सोहळ्याला न्या. नरेंद्र चपळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर अध्यक्षस्थानी होते. विश्‍वस्त न्या. विकास सिरपूरकर आणि डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर  यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. जोग म्हणाले, ‘मुख्यमंत्री मराठा झाला म्हणून  राज्य मराठ्यांचे होत नाही आणि मुख्यमंत्री ब्राह्मण असला म्हणजे पेशवाई येत नाही, हे साहित्यिकांनी लोकांना सांगितले पाहिजे आणि भंपक धर्मनिरपेक्षवाद्यांचे पितळ उघडे केले  पाहिजे. नाहीतर साहित्यिकांचे शब्द प्लॅस्टिकचे ठरतील आणि प्लॅस्टिकमुळे होते तसे शब्दांनीही प्रदूषण होईल.’ ‘वयाच्या बाराव्या वर्षापासून मी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता आहे. पण, कधीकधी विदर्भावरील अन्यायाने संतप्त होतो, तेव्हा डॉ. श्रीपाद जोशी मला ताळ्यावर आणतात आणि मधुकर कुकडे भूमिकेवर परत आणतात,’ असेही ते म्हणाले. 

या कार्यक्रमाला ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे, ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, ज्येष्ठ लेखिका आशा बगे, ज्येष्ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती. संचालन प्रकाश एदलाबादकर आणि शुभदा फडणवीस यांनी केले. 

बहुप्रतीक्षित सभागृहात वर्धापनदिन
धनवटे रंगमंदिराच्या जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक संकुलात गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहाचे काम सुरू होते. नियोजित कालावधी लोटला तरी सभागृहाचे काम पूर्ण झाले नव्हते. मात्र, साहित्य संघाचा ९५ वा वर्धापनदिन पाचव्या माळ्यावरील सुसज्ज सभागृहात होत आहे, हे जवळपास सर्वांसाठीच एक मोठे ‘सरप्राईज’ होते. ९८० आसनक्षमता असलेल्या या सभागृहाचा रंगमंच ४३ फूट एवढा आहे. सभागृहाच्या गॅलरीचे काम शिल्लक असून येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. रंगमंचाचे पडदे आणि विंग्सच्या सजावटीसाठी सुनील कोठारे तसेच सभागृहाच्या निर्मितीसाठी आशुतोष शेवाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

वाङ्‌मय पुरस्कारांचे मानकरी
  ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती ‘जीवनव्रती’ पुरस्कार - डॉ. वि. स. जोग
  डॉ. य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीयलेखन पुरस्कार - ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक डॉ. मधुकर आपटे (‘खगोलशास्त्राचे अंतरंग’ या ग्रंथासाठी)
  गो. रा. दोडके स्मृती ललितलेखन पुरस्कार - रवींद्र जवादे (‘दिवेलागण’ या लेखसंग्रहासाठी)
  शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कवितालेखन पुरस्कार - मो. ज. मुठाळ (‘रानोमाळ’ या कवितासंग्रहासाठी) 
  डॉ. मा. गो. देशमुख स्मृती संत साहित्य लेखनाचा पुरस्का र - संजय बर्वे (‘आदि श्रीगुरुग्रंथसाहेबातील कबीर’ या ग्रंथासाठी) 
  कुसुमानिल स्मृती समीक्षालेखन पुरस्कार - डॉ. पराग घोंगे (‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र ः एक रसास्वाद’ या ग्रंथासाठी)
  नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार - डॉ. मधुकर वि. नंदनवार (‘भंडारा जिल्ह्यातील  लोकनाट्य दंडार’साठी) आणि डॉ. गिरीश नारायण सपाटे (‘काळोख गडद होत चाललाय’ या कवितासंग्रहासाठी)
  कविवर्य ग्रेस युगवाणी लेखन पुरस्कार - प्रा. पुरुषोत्तम माळोदे (‘सर्जनशील समीक्षक ः डॉ. द.भि. कुळकर्णी’ या ग्रंथासाठी)
  हरिकिसन अग्रवाल पत्रकारिता पुरस्कार - राम भाकरे
  उत्कृष्ट शाखा पुरस्कार - विदर्भ साहित्य संघ अकोला
(पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप होते) 

Web Title: nagpur news litterateur