अनुशेषाचे गाढे अभ्यासक ॲड. किंमतकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नागपूर - विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, काँग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ॲड. मधुकरराव ऊर्फ मामा किंमतकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. उद्या गुरुवारी (ता. ४) रामटेक मूळगावी त्यांच्यावर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

नागपूर - विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, काँग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ॲड. मधुकरराव ऊर्फ मामा किंमतकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. उद्या गुरुवारी (ता. ४) रामटेक मूळगावी त्यांच्यावर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

फुप्फुसाचा त्रास असल्याने त्यांना धंतोली येथील गेटवेल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व चार कन्या आहेत. विदर्भाच्या अनुशेषाचा व प्रश्‍नांचा गाढा अभ्यास असलेल्या ॲड. मधुकर किंमतकर यांचा जन्म १० ऑगस्ट १९३२ साली रामटेक येथे झाला. नागपुरात शिक्षणासाठी आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नरेंद्र तिडके यांच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी कामगार चळवळीत भाग घेतला. कामगार चळवळीत भाग घेतल्याने त्यांनी या चळवळीसाठी पूरक व्हावे, यासाठी कायद्याची परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ गांधीवादी व न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात वकिली केली. कामगार चळवळीचे प्रश्‍न मांडत असताना त्यांनी काँग्रेसशी नाळ तोडली नाही. रामटेकमध्ये त्यांनी विविध सामाजिक कार्यांत सहभाग घेतला होता. १९८० मध्ये त्यांना रामटेकमधून काँग्रेसने उमेदवारी दिली.  पान ६ वर 
अनुशेषाचे गाढे अभ्यासक ॲड. किंमतकर यांचे निधन त्यात ते निवडून आले. ए. आर. अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांचा १९८२ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्याही मंत्रिमंडळात किंमतकर अर्थराज्यमंत्री होते. 

१९८५ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर रामटेक मतदारसंघातून पी. व्ही. नरसिंहराव यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन किंमतकर यांनी केले. यातून त्यांचे नरसिंहराव यांच्याशी निकटचे संबंध निर्माण झाले होते. रामटेक मतदारसंघातील नरसिंहराव यांचे दूत म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या आग्रहाने पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेकमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. 

१९९० नंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य विदर्भाच्या अनुशेषाच्या अभ्यास करण्यासाठी घालविले. विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते आग्रही होते. १९९२ मध्ये त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली. या काळात त्यांनी विदर्भाच्या अनुशेषावर अभ्यासपूर्ण भाषणे करून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. विदर्भाचे प्रश्‍न मांडण्यासाठी विदर्भातील आमदारांचा एक गट तयार झाला होता. या गटाचे ते मार्गदर्शक होते. १९९४ मध्ये विदर्भ वैधानिक मंडळाची स्थापना झाल्यानंतर राज्य शासनाने त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदीसुद्धा नियुक्ती केली होती.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही त्यांचा अभ्यास बघून विदर्भ वैधानिक विकास मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भाच्या अनेक मुद्द्यांवर माहिती देण्याची जबाबदारी किंमतकर यांनी पार पाडली होती. फडणवीस आमदार असताना ते विदर्भाला मिळणाऱ्या निधीबद्दल तसेच अनुशेषाबद्दल त्यांच्याकडून माहिती घेत असत.

Web Title: nagpur news madhukarrao kimatkar death