दिग्दर्शक मधुर भांडारकरांची काँग्रेसमुळे नागपुरात भागमभाग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

'इंदू सरकारला' तीव्र विरोध : पत्रपरिषद उधळवण्याच्या भीतीने रद्द 

'संघ, भाजपचे षडयंत्र' 
आणीबाणीच्या काळात संघावर लादण्यात आलेली बंदीसारख्या विषयावर टिप्पणी करण्यात आली आहे. तसेच आणीबाणीच्या काळात इंदिराजींनी घेतलेल्या काही निर्णयांना चुकीचे दाखवून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. हा चित्रपट संघ आणि भाजपचे षडयंत्र असून भांडारकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा चित्रपट दाखवायला हवा. चित्रपटात काही आक्षेपार्ह नसेल तर काँग्रेसचा त्याला विरोध राहणार नाही. मात्र, तसे न करता भांडारकर यांनी दाखविलेला पळकुटेपणा त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय निर्माण करणारा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच चित्रपट ज्या टॉकीजमध्ये प्रदर्शित होईल त्या टॉकीजची खैर नाही, असा इशारा देखील दिला. 

नागपूर : पुण्यापाठोपाठ नागपुरातही दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'इंदू सरकार' या वादग्रस्त चित्रपटाला काँग्रेसतर्फे रविवारी (ता. 16) विरोध करण्यात आला. काँग्रेसने केलेल्या तीव्र विरोधामुळे भांडारकर यांना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजिण्यात आलेली पत्रपरिषद रद्द करून पळ काढावा लागला. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लागलेल्या आणीबाणीवर टीका करणारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. पुण्यात शनिवारी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनला विरोध केला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह चित्रपटातील काही कलावंतांना पत्रकारपरिषदस्थळी कोंडून ठेवले होते. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात 'इंदू सरकार' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रपरिषद आयोजिण्यात आली होती. हॉटेल पोर्तु गोमेज येथे पत्रपरिषद सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव केला. यामुळे भांडारकर हे पत्रपरिषदस्थळी आलेच नाही. दरम्यान भांडारकर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे असल्याची माहिती मिळताच काँगेस कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. मात्र, भांडारकर वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पॉईंट गेल्याचे कळाले. तिथे विचारणा केली असता भांडारकर यांच्या नावाने चार खोल्या बूक असून ते तिथे आलेच नसल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. 
यानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भांडारकर यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांना गाठून काळे फासण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर विमानताळ गाठले. परंतू, भांडारकर 'चेक ईन' करून 'व्हीआयपी लाऊंज' होते. तिथे प्रवाशांशिवाय इतरांना प्रवेश नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झाली. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, प्रशांत धवड यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ता उपस्थित होते. 

पोलिसांनी दिली धमकी 
चित्रपटाविरुद्ध करण्यात आलेल्या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्ते हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट येथे चहा घेण्यास गेले. त्यावेळी पोलिसांनी 'डिटेन' करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या या कृतीचा शहर काँग्रेसने विरोध केला आहे. पोलिसांची भूमिका जनरल डायरप्रमाणे असल्याची टीकादेखील यावेळी काँग्रेसने केली. 

Web Title: nagpur news madhur bhandarkar press conference cancelled congress protests