'कॉंग्रेस-राष्ट्रवादीची डल्लामार यात्रा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नागपूर  - ""ज्यांनी पंधरा वर्षांच्या कार्यकाळात गैरव्यवहारच केले त्यांना पारदर्शकतेची भीती वाटणे सहाजिकच आहे. शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या स्थितीलाही तेच जबादार आहेत. याची तुलनात्मक आकडेवारी सभागृहात ठेवली जाईल,'' असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेला डल्लामार यात्रा संबोधून खिल्ली उडवली. 

नागपूर  - ""ज्यांनी पंधरा वर्षांच्या कार्यकाळात गैरव्यवहारच केले त्यांना पारदर्शकतेची भीती वाटणे सहाजिकच आहे. शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या स्थितीलाही तेच जबादार आहेत. याची तुलनात्मक आकडेवारी सभागृहात ठेवली जाईल,'' असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेला डल्लामार यात्रा संबोधून खिल्ली उडवली. 

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले. विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यचे प्रश्‍न चर्चेने सोडविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचेही सांगितले. ""या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत धान्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आयात-निर्यात शुल्क निश्‍चित केल्याने राज्यावरील खरेदीचा ताण कमी झाला आहे. तब्बल पंधरा वर्षांपासून आयात-निर्यातीचे दर ठरविण्याची मागणी केली जात होती. ती यंदा मान्य करण्यात आली. केंद्र शासनाने विदर्भ, मराठवाड्यासह मागासभागातील एकूण 108 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची मोठी अडचण दूर होणार आहे. गोसेखुर्दची 18 हजार कोटीची किंमत निश्‍चित झाली आहे. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे,'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची नावे जाहीर करणार 
आघाडीच्या कार्यकाळात कर्जवाटपाच्यावेळी झालेला घोळ पुन्हा होऊ नये याकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. कर्जमाफीसाठी 77 लाख अर्ज आले होते. यापैकी 41 लाख खात्यांचा निर्णय झाला आहे. दोन लाख 21 खात्यांमध्ये कर्जाची रक्कमसुद्धा जमा झाली आहे. आतापर्यंत बारा लाख खात्यात पैसे जमा करण्यासाठी बॅंकांना पैसे वाटप करण्यात आले आहे. जे पात्र असतील मात्र अर्ज करू शकले नाही त्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. तसेच सर्व शेतकऱ्यांची नावेसुद्धा वेबसाइटवर टाकली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिष्यवृत्तीत पाच हजार कोटींचा गैरव्यवहार 
आघाडीच्या कार्यकाळात तीन वर्षे शिष्यवृत्तीचे वाटपच करण्यात आले नव्हते. यात सुमारे पाच हजार कोटींचा गैरव्यवहार आहे. याची चौकशीही सुरू आहे. आघाडीच्या काळातील शिष्यवृत्तीचे पैसे आम्ही वाटले. तसेच चालू वर्षाच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले. शिष्यवृत्ती ऑनलाइन करण्यात आली. ती आधार कार्डाशी लिंक करण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे वाचले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

नाना पटोलेंनी चूक केली 
फडणवीस म्हणाले, ""खासदार नाना पटोले यांना राजीनामा देण्याची उपरती झाली. यापूर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये असतानाही राजीनामा दिला होता. मात्र लवकरच त्यांना आपली चूक लक्षात येईल.'' 

आशीष देशमुखांचे पत्र वाचले नाही 
आमदार आशीष देशमुख यांच्या पत्रावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपण ते वाचले नाही असे सांगितले. त्यांनी आधी पत्र माध्यमांना दिले नंतर मला पाठविले. ते वाचल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल. 

Web Title: nagpur news Maharashtra CM Devendra Fadnavis congress NCP BJP