'शिक्षण पद्धतीतील बदलांचे आव्हान स्वीकारा'

'शिक्षण पद्धतीतील बदलांचे आव्हान स्वीकारा'

नागपूर - हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. शिक्षण पद्धतीतील बदलाचा स्वीकार करतांनाच नामवंत विद्यार्थी या शाळेने घडविले. आता काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कौशल्यपूर्ण युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  

लिबरल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित हडस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा अमृत महोत्सवाच्या उद्‌घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संस्थेचे अध्यक्ष पी. व्ही. खांदेकर, सचिव डॉ. ए. पी. जोशी, व्ही. बी. सपळे, के. बी. जोशी, हडस मुख्याध्यापिका श्रीमती सविता कुंडले, ज्योती बेंद्रे, प्राजक्ता शुक्‍ला, के. व्ही. जोशी, दीपा फडके, कल्याणी शास्त्री उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘डिजिटलायझेशनच्या काळामध्ये राज्यातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या ६२ हजार शाळा डिजिटलायझेशन करून प्रगत झाल्या आहेत. मागील तीन वर्षांत शिक्षण क्षेत्रात केलेल्या बदलामुळे नागपूर जिल्ह्याने शिक्षणाच्या गुणवत्तेत १८ वरून तिसऱ्या क्रमांकावर प्रगती केली. आता शहरात आंतरराष्ट्रीय संस्था सुरू झाल्या आहेत. येत्या काळात टीसीएसचे मोठे केंद्र, एअरोस्पेस पार्क सुरू होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असून कौशल्य शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण करणे गरजेचे आहे. हडससारखी संस्था त्या बदलाचा स्वीकार करून एक आधुनिक संस्था म्हणून ओळख निर्माण करतील विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील उद्योगांना सक्षम मनुष्यबळ पुरविण्यासाठी शिक्षण संस्थांनी उत्तम कौशल्ययुक्त विद्यार्थी तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा. शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. कारण संस्कारक्षम पिढीच कुटुंबसंस्था टिकवून ठेवू शकते. कुटुंबसंस्था टिकून राहिल्या तरच समाजस्वास्थ टिकून राहील. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा संस्कार रुजविणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव डॉ. ए. पी. जोशी यांनी आजवर संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ‘अमृत गाथा’ या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्‍यांच्या गजरात स्मरणिका पालखीतून सभा मंडपात आणण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com