सारेच आश्‍वस्त अन्‌ तेवढेच अस्वस्थही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

नागपूर - एकमेकांच्या क्षमतेची पर्वा न करता यंदाचे उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे कुणीतरी माघार घ्यावी, यासाठी होणाऱ्या राजकारणाला यंदाची संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक मुकणार असल्याचे चित्र आहे. जो काही प्रयत्न करायचा, तो उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे "या वर्षी थांबा, पुढच्या वर्षी तुम्हीच अध्यक्ष' या डायलॉगलाही यंदा "स्कोप' उरलेला नाही. 

नागपूर - एकमेकांच्या क्षमतेची पर्वा न करता यंदाचे उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे कुणीतरी माघार घ्यावी, यासाठी होणाऱ्या राजकारणाला यंदाची संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक मुकणार असल्याचे चित्र आहे. जो काही प्रयत्न करायचा, तो उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे "या वर्षी थांबा, पुढच्या वर्षी तुम्हीच अध्यक्ष' या डायलॉगलाही यंदा "स्कोप' उरलेला नाही. 

बडोदा येथे होऊ घातलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. राज्यभरातून पाच उमेदवारांचे अर्जही दाखल झाले आहेत. राजन खान, रवींद्र गुर्जर, डॉ. किशोर सानप, लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉ. रवींद्र शोभणे या पाच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधायलाही सुरवात केलेली आहे. मुख्य म्हणजे यातील प्रत्येकच उमेदवाराला अर्ज भरण्यापूर्वी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे थांबण्याचा सल्ला मध्यस्थांनी दिलेला आहे. मात्र तरी सद्यःस्थितीत पाचही उमेदवार एकमेकांच्या पुढे उभे ठाकले आहेत. या पैकी रवींद्र गुर्जर यांना अपेक्षा असली, तरी त्यांच्या वाट्याला निराशा येण्याची दाट शक्‍यता आहे, अशी साहित्यवर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे तशी लढत चारच उमेदवारांमध्ये आहे. 

डॉ. किशोर सानप आणि डॉ. रवींद्र शोभणे यांच्यापैकी कुणाच्या पाठीशी विदर्भ साहित्य संघ उभा राहणार, याबाबत अद्यापि अनिश्‍चितता आहे. दोन्ही उमेदवारांना विश्‍वास असला, तरी मनोहर म्हैसाळकर यांच्यावर सारेकाही अवलंबून असेल. औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेने जाहीर केले नसले, तरी लक्ष्मीकांत देशमुखच त्यांचे अधिकृत उमेदवार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून राजन खान आणि लक्ष्मीकांत देशमुख या दोघांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबईतून नेहमीप्रमाणे संमिश्र मतदान होण्याची शक्‍यता आहे. मात्र, यंदा पुणे आणि विदर्भ एकत्र येऊन मराठवाड्याला एकटे पाडण्यासाठी कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात, यावर सारा खेळ अवलंबून असेल. 

मराठवाड्यातील पावणेदोनशे आणि बडोद्यातील यजमान संस्थेची 96 मते असे जवळपास तीनशे मतांची गणती सध्या लक्ष्मीकांत देशमुख यांच्या बाजूने आहे, असे वाटत असले तरी मराठवाड्यात फूट पडण्याची दाट शक्‍यता आहे. याचसोबत बडोद्याची भूमिकाही ऐनवेळी उघड होईल, असे चित्र आहे. थोडक्‍यात सारेच आश्‍वस्त आहेत आणि तेवढेच अस्वस्थही.

Web Title: nagpur news marathi Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan