शाळा, महाविद्यालयांसाठी सौरऊर्जा उपकरणांवरील सवलत 50 टक्‍क्‍यावर: बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

शाळा आणि महाविद्यालयांनी सौर ऊर्जेचा अधिकाअधिक वापर करण्याच्या ऊद्देशाने त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी देण्यात येणारी सवलत तीस टक्‍क्‍याहून 50 टक्‍क्‍यावर नेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

नागपूर - सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेता, त्यासाठी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्य शासन त्याबद्दल सकारात्मक असून शाळा आणि महाविद्यालयांनी सौर ऊर्जेचा अधिकाअधिक वापर करण्याच्या ऊद्देशाने त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी देण्यात येणारी सवलत तीस टक्‍क्‍याहून 50 टक्‍क्‍यावर नेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालय प्राचार्य संघटना आणि धनवटे नॅशनल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय प्राचार्य अधिवेशनाच्या ऊद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.अरूण शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील केदार, ऊच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, राष्ट्रीय प्राचार्य संघटनेचे डॉ. सुभाष ब्रम्हभट, माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, सहसंचालक डॉ.अंजली रहाटगावकर, सचिव डॉ. टाले ऊपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अधिकाअधिक महाविद्यालयांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास 80 टक्के वीजबचत होईल. ही वीजबचत राज्याला पुढे नेण्यास फायदेशिर ठरणारी आहे. महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राचार्यांच्या अधिवेशनात शिक्षणपद्धतीवर विचारमंथन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. शासकीय स्तरावर काम करताना अनेक अडचणी येतात. तेव्हा प्राचार्य, शिक्षक संघटनांच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होते. आवाहन त्यांनी केले.

डॉ. सुभाष ब्रम्हभट यांनी देशातील अर्थसंकल्पात शिक्षणासाठी होणारी तरतूद बरीच अत्यल्प असल्याने शैक्षणिक संस्थांचे खासगीकरण होत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे सांगितले. इतर देशाच्या शिक्षणाविषयी वारंवार बोलल्या जात असताना, त्या ठिकाणी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोनाकडे सरकारचा विसर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ती तरतूद वाढविण्यासाठी राजकीय पुढाकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ऍड. शेळके यांनी दिवसेंदिवस शिक्षणाकडे होणारे सरकारचे दूर्लक्ष यातूनच शैक्षणिक अधोगती होत असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. संचालन डॉ. कोमल ठाकरे तर आभार डॉ. टाले यांनी मानले. कार्यक्रमात राज्यभरातील पाचशेहुन प्राचार्य सहभागी झाले होते. तत्पूर्वी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: nagpur news marathi news sakal news chandrashekhar bavankule