पराभूत उमेदवारांना निमंत्रणच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेत "पत्रिका व मतपत्रिका' या दोन गोष्टी वेळेवर न पोचणे ही आता अत्यंत सामान्य बाब ठरू लागली आहे. मतपत्रिका पोचल्या नाहीत तर उमेदवारांचे नुकसान होत असते आणि पत्रिका पोचल्या नाहीत तर आयोजकांना साहित्यिकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. यंदा बडोद्यातील आयोजकांनी संमेलनाध्यक्ष निवडणुकीतील उमेदवार डॉ. रवींद्र शोभणे आणि डॉ. किशोर सानप या दोघांनाही निमंत्रण न पाठवून नाराजी ओढवून घेतली आहे.

बडोदा येथे 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (ता. 16) प्रारंभ होत आहे. राज्यभरातील जवळपास पाचशे प्रतिनिधी यामध्ये नोंदणी करून सहभागी होत आहेत, तर शंभरएक साहित्यिक निमंत्रित म्हणून सहभागी होत आहेत. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. रवींद्र शोभणे दुसऱ्या क्रमांकावर, तर डॉ. किशोर सानप चौथ्या क्रमांकावर होते. या दोघांनीही निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रात दौरे केले. यात स्वाभाविकपणे बडोद्याचाही समावेश होता. तरीही निमंत्रितांची यादी तयार करताना आयोजकांना या दोघांचाच विसर पडावा, ही आश्‍चर्याची बाब ठरते.

दरम्यान, राजन खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही, तर रवींद्र गुर्जर यांनी निमंत्रण मिळाले असून, बडोद्याला जायची तयारी सुरू असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.

निमंत्रणपत्रिका मिळाली असती आणि आयोजकांनी सन्मानाने बोलावले असते, तर बडोद्यातील साहित्य संमेलनात सहभागी व्हायला नक्कीच आवडले असते; पण आता बडोद्याला जाण्याचा प्रश्‍नच नाही.
- डॉ. रवींद्र शोभणे

संमेलनाध्यक्षांसोबत निवडून न आलेल्या चारही उमेदवारांचा संमेलनात सत्कार व्हायला हवा. निवडणुकीदरम्यान आलेल्या अनुभवांवर सर्वांचा एक परिसंवादही व्हायला हवा; पण उमेदवार म्हणून किंवा बडोदा वाङ्‌मय परिषदेचा सभासद म्हणूनही साधे निमंत्रणसुद्धा मिळाले नाही.
- डॉ. किशोर सानप

असाही इतिहास...
चंद्रपूरला 1979 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. गंगाधर पानतावणे पराभूत झाले होते. वामनराव चोरघडे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. संमेलनाच्या आधी स्वतः वामनराव चोरघडे यांनी डॉ. पानतावणे यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. एवढेच नव्हे, तर या संमेलनातील एका परिसंवादात आयोजकांनी पानतावणे यांना सहभागीसुद्धा करून घेतले.

Web Title: nagpur news marathi sahitya sammelan candidate invitation