औषधांचे दान हीच ईश्‍वरसेवा 

औषधांचे दान हीच ईश्‍वरसेवा 

नागपूर - दु:खी, पीडित लोकांवर कृपेचा वर्षाव करीत "भिऊ नकोस; मी तुझ्या पाठीशी आहे!' असा आध्यात्मिक आधार बेसा परिसरातील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात मिळतो. भक्तिमार्ग देणाऱ्या या स्वामीधाम मंदिरातून रंजल्या-गांजल्यांची, गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा असे व्रत स्वीकारून "आरोग्यधाम' तयार केले. गरीब रुग्ण औषधं खरेदी करू शकत नसल्यानं मंदिरातून "औषधांचे दान करा हो' असे आवाहन करण्यात आले. यातून मंदिरात "औषधांची दान पेटी' तयार झाली आणि गरिबांच्या आरोग्यावर ही औषधांची पेढी (मेडिसिन बॅंक) वरदान ठरली. स्वामीभक्तांनी आणून दिलेल्या औषधांच्या मदतीवर गेल्या दीड वर्षांपासून रुग्णसेवेचा धर्म सुरू झाला. डॉक्‍टरांच्या मोफत सेवेचा लाभ या परिसरातील गरीब रुग्णांना मिळत आहे. स्वामीधामच्या या आरोग्यदायी चळवळीला गतिमान करण्यासाठी आपल्या घरी असलेली शिल्लक औषधं मंदिराच्या मेडिसिन बॅंकेत जमा करू या... आणि गरीबांच्या रुग्णसेवेला हातभार लावू या... 

विदर्भाचे अक्कलकोट म्हणून नावारूपास आलेल्या बेसा परिसरातील श्री स्वामी मंदिर (स्वामीधाम)मध्ये सेवाधामाला सुरवात झाली. मानवी सेवेचा हा भक्तिमार्ग स्वामीभक्त दिनकर कडू यांनी सुरू केला. मंदिरातून आरोग्यसेवेसाठी सुरवातीला एक खुर्ची टेबल टाकून गरीबांना मोफत सेवा देण्याचे काम सुरू केले. पुढे या परिसरात "आरोग्यधाम' नावाने स्वतंत्र इमारत तयार केली. गरीबांना वैद्यकीय अडचणीत मदतीचा हात देणारे "धाम' तयार झाल्यानंतर 5 मे 2016 रोजी रितसर बाह्यरुग्ण विभागाचे उद्‌घाटन झाले. डॉ. आरती पाठक यांच्या मदतीने होमिओपॅथी युनिटमध्येही रुग्णसेवेचे व्रत सांभाळले जाते. 

"मोफत' सेवा देणारे डॉक्‍टर 
आरोग्यसेवा विभागातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सोपान माकडे यांनी येथे मोफत रुग्णसेवा देण्याचे व्रत स्वीकारले. बाह्यरुग्ण विभागात सकाळी साडेआठला येतात. दुपारी एकपर्यंत आराधना परिवाराच्या आरोग्यधाम येथे आलेल्या रुग्णांना तपासतात. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत अडीच हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला. सुरवातीला काही औषधं खरेदी करून रुग्णांना देण्यात येत होती. परंतु, रुग्णांची वाढती संख्या बघता मोफत औषधं देणे शक्‍य नव्हते. महागडी औषधं खरेदी करणे गरीब रुग्णांच्या आवाक्‍यात नव्हते. यामुळे सुरू केलेले आरोग्यधाम बंद पडण्याची भिती असतानां स्वामीभक्त कडू यांनी ही समस्या अनेक डॉक्‍टर मित्रांजवळ बोलून दाखवली. आणि येथून मेडिसीन बॅंकेची संकल्पना डॉ. सुधीर अघाव यांनी बोलून दाखवली. 

गरिबांसाठी "मेडिसिन बॅंक' साकारली 
प्रत्येक घरी कोणीतरी आजारी पडतोच. डॉक्‍टरकडे गेल्यानंतर "प्रीस्क्रिप्शन'वरील सारी औषधी खरेदी केली जाते. मात्र, आजार बरा झाला की, पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त औषधं टाकून दिली जातात. ही औषधं टाकून देण्यापेक्षा स्वामीधाम मंदिरात आणून द्यावी, असे आवाहन स्वामीधाम मंदिरात येणाऱ्या भक्तांना करण्यात आले. ही औषधं गोळा करण्यासाठी स्वामीधाम मंदिरात "पेटी' ठेवली. आजारातून बरे झालेल्या शेकडो व्यक्तींना शिल्लक असलेली औषधं या पेटीत आणून टाकली. स्वामीभक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला. दोन दिवसांत येथे औषधांची पेटी भरू लागली. भक्तांकडून मिळणारा प्रतिसाद बघता रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्‍टर समाधान व्यक्त करू लागले. ही संकल्पना मूळची डॉ. सुधीर अघाव यांची आहे. यांच्यामुळेच गरीबांना येथे औषधं मोफत मिळत आहेत. मुदतबाह्य झालेली औषधी टाकून देण्यात येतात. 


भक्तीमार्गासाठी "स्वामीधाम' तयार झाले. यानंतर ज्यांचे कोणी नाही, अशा वृद्धांच्या आयुष्याला अखेरच्या थांब्यावर जगण्याचे समाधान मिळावे, यासाठी "वृद्धाश्रम' अर्थात "सेवाधाम' उभारले आहे. वृद्धांना वृद्धाश्रमात मोफत आरोग्यसेवा दिली जाते. वृद्धांसोबतच गरीबांन रुग्णांना आरोग्यसेवा सुरू केली. मेडिसिन बॅंकेच्या आधारामुळे "आरोग्यधाम' स्थिरावले. तीन धाम झाले. गरीब मुलांसाठी चौथे "शिक्षाधाम' तयार करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर आहे. 
-दिनकर कडू, अध्यक्ष, आराधना परिवार, स्वामीधाम मंदिर, बेसा. 

"सकाळ'तर्फे आवाहन 
उपराजधानीच्या शहर सीमेवरील बेसा परिसरातील स्वामीधाम मंदिरातून गरीबांना मोफत रुग्णसेवेचा उपक्रम सुरू आहे. या आरोग्यदायी सेवाधर्माला मदत करण्यासाठी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा फाउंडेशन तसेच डॉक्‍टरांच्या अनेक संघटना आहेत. यांनी काही प्रमाणात का होईना औषधांची तसेच या भागातील गरीबांना आरोग्य शिबिर आयोजनातून एक दिवस आपली सेवा द्यावी आणि स्वामीधामच्या या सेवेला हातभार लावावा, असे आवाहन "सकाळ'तर्फे करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com