पावसाळ्यात मंदावणार नाही गती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - शहरातील सर्वच भागात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असून, पावसाळ्यात  नागरिकांना फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महामेट्रोने पावसाळ्यासाठी वेगळा कृती आराखडा तयार केला. त्यामुळे पावसातही मेट्रो रेल्वेच्या कामाची गती कायम  राहणार आहे. शिवाय प्रकल्पाच्या कामाचा नागरिकांना फटका बसू नये, याबाबत उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे. 

नागपूर - शहरातील सर्वच भागात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असून, पावसाळ्यात  नागरिकांना फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महामेट्रोने पावसाळ्यासाठी वेगळा कृती आराखडा तयार केला. त्यामुळे पावसातही मेट्रो रेल्वेच्या कामाची गती कायम  राहणार आहे. शिवाय प्रकल्पाच्या कामाचा नागरिकांना फटका बसू नये, याबाबत उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे. 

शहरात पूर्व-पश्‍चिम व उत्तर दक्षिण या मेट्रो मार्गाचे तसेच त्यावरील रेल्वे स्थानकाची कामे वेगाने सुरू आहेत. २०१९ पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याचे लक्ष्य महामेट्रोने ठेवले आहे. ते गाठण्यासाठी शहराच्या चारही भागात पिलरसाठी खोदकाम तर कुठे रेल्वे स्टेशनसाठी खोदकाम सुरू आहे. सेंट्रल एव्हेन्यू, उत्तर अंबाझरी मार्ग, कामठी रोडवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या मध्यभागातील जागा अधिग्रहीत करून त्यावर कामे सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. परंतु, मेट्रो रेल्वेला नागपूरकरांचाही मोठा पाठिंबा असल्याने नागरिकही त्रास सहन करीत आहे. परंतु, पावसाच्या पाण्याने या खोदकामाची माती रस्त्यांवर आल्यास पावसाळ्यात त्यावर वाहने घसरण्याची शक्‍यता आहे. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या कामावर पावसाचा परिणाम होऊ नये, यासाठी महामेट्रोने कृती आराखडा तयार केल्याचे  महामेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीश आपटे यांनी नमूद केले.  

वाहतूक पोलिसांसोबत चर्चा 
वाहतूक पोलिस उपायुक्त रवींद्र परदेशी यांच्यासोबत मेट्रो रेल्वेच्या पावसाळी कामाबाबत तसेच या कामाच्या ठिकाणी वाहतुकीच्या नियंत्रणासाठी चर्चा झाली. या बैठकीत मेट्रो रेल्वेचे चारही प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीत नागरिकांची सुरक्षा, वाहतुकीसंबंधी खल झाला असून, पावसाळ्यासाठी उपाययोजनांना पोलिसांचेही सहकार्य मिळणार आहे. 

वेगवेगळ्या संस्थांशी समन्वय 
पावसाळ्यात पाणी जमा होण्याचे प्रकार होतात. त्यावर नियंत्रणासाठी महामेट्रोने महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वयाची तयारी केली आहे. महामेट्रोच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दिवसाप्रमाणे रात्रीही मेट्रो रेल्वेचे काम वेगाने होणार आहे.  

आपत्कालीन पथक तयार 
नुकताच शहरात आलेल्या वादळामुळे अनेक भागांत मेट्रो रेल्वेचे बॅरिकेड्‌स उडाले होते.  त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीसोबतच मेट्रो रेल्वेचे प्रत्यक्ष जमिनीवरील कामातही अडथळा  निर्माण झाला होता. अशी आपत्कालीन स्थिती पावसाळ्यात निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या स्थितीशी निपटण्यासाठी महामेट्रोने आपत्कालीन पथके तयार केली आहेत.

पावसाळ्यात खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिस उपायुक्तांसोबत नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत पावसाळ्यातील स्थिती लक्षात घेता वाहतुकीबाबत चर्चा झाली. याशिवाय महापालिका व इतर विभागांशी समन्वय साधून मेट्रो रेल्वेची कामे सहज होतील तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 
- शिरीष आपटे,  मुख्य जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

Web Title: nagpur news metro vidarbha