डॉक्‍टरसाहेब, कधी सुरू राहते डे-केअर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डे-केअर सेंटर तयार केले आहेत. मात्र, मेयोतील डे-केअर सेंटरला नेहमीच कुलूप दिसत असल्याची व्यथा सिकलसेलग्रस्तांनी व्यक्त केली. मेयोतील डे-केअर सेंटर कधी सुरू राहाते जी, अशी विचारपूस सिकलसेलग्रस्त करीत आहेत.

गरिबांना मेडिकल किंवा मेयोतील आरोग्य यंत्रणेचाच आधार आहे. गरिबांना योग्य आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासन कोट्यवधींचा निधी खर्च करते. मात्र, सरकारच्या उदात्त हेतूला हरताळ फासण्याचे काम सरकारी रुग्णालयातूनच होत आहे. मेयोतील डे-केअरला दुपारी कुलूप असल्यामुळे अनेक रुग्ण आल्यापावली परत परत गेले. कुलूप लावल्यामुळे रुग्ण आपोआपच परत जातात, हा फंडा येथील डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांनी अंमलात आणला आहे.
सिकलसेलग्रस्तांना रक्त लावण्यासाठी तसेच गंभीर सिकलसेलग्रस्ताला दिवसभर निरीक्षणात ठेवण्यासाठी मेयोत डे-केअरसेंटर तयार झाले.

येथे भरती असलेले सिकलसेलग्रस्त दिवसभराच्या आरोग्य सुविधेनंतर घरी परत जातात. मात्र, या केअर सेंटरकडे फारसे मेयो प्रशासनाचे लक्ष नाही. पूर्वीचा जळीत विभाग असलेल्या वॉर्डात हे डे-केअर सेंटर तयार केले. मात्र, येथे सुविधांचा अभाव असल्याचे सांगण्यात आले.

डौलदार फलक
सिकलसेलग्रस्ताला रक्त देण्यापासून, तर एका दिवसाच्या कालावधीसाठी डॉक्‍टरांच्या निगराणीची गरज असेल अशे रुग्ण डे-केअर सेंटरमध्ये असतात. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात सेंटर सुरू असते. तसा फलक येथे लावला आहे. दर्शनी भागात नुसता फलकच झळकतो. सिकलसेलग्रस्त कधीही गंभीर होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांच्या शरिरात रक्ताची कमतरता असते. असह्य वेदना ते सोसत असतात. यामुळेच सरकारने दिवसभरासाठीच्या उपचारासाठी डे-केअर सेंटर सुरू केले. परंतु, मेयो प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथे फारसे सिकलसेलग्रस्त येत नसल्याची चर्चा आहे.

Web Title: nagpur news meyo hospital day care center