मिहानमध्ये शुक्रवारी होणार अंबानींच्‍या विमानाचे लॅंडिंग

मिहानमध्ये शुक्रवारी होणार अंबानींच्‍या विमानाचे लॅंडिंग

नागपूर - मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला. येत्या शुक्रवारी पार्कचे भूमिपूजन करण्यात येणार असून त्याकरिता संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना आणण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर केले जात आहेत. अद्याप त्यांची मान्यता मिळाली नसली तरी भूमिपूजनाचा कार्यक्रम मात्र निश्‍चित झाला आहे. येथे संरक्षण दलाला लागणाऱ्या विमानांच्या सुट्या भागांची निर्मिती केली जाणार आहे. 

सुमारे दोन वर्षांपूर्वी रिलायन्सने मिहानमध्ये जागा घेतली होती. मात्र, दोन वर्षांपासून काहीच हालचाली होत नसल्याने हीसुद्धा निव्वळ घोषणाच ठरणार असे बोलल्या जात होते. मात्र, जागतिक मंदीमुळे विदेशी कंपन्यांचे सहकार्य मिळत नसल्याने भूमिपजून लांबल्याचे कळते. आता सर्व अडचणी दूर झाल्या असून काही विदेशी कंपन्यांनी यात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवल्याने या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. 

संरक्षण सामग्रीबाबत आपला देश इतर देशांवरच अवलंबून आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली. संरक्षणक्षेत्रातही भारताला स्वावलंबी करण्यासाठी रिलायन्सने पुढाकार घेतला. हा प्रकल्प नागपुरात यावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले. अंबानी यांना मिहानमध्ये आणले. त्यांनी २८९ एक जमीन येथे घेतली.

रिलायन्सने रफाल जेट फायटरची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या ‘डसॉल्ट एव्हिएशन’ आणि थेल्ससोबत फेब्रुवारीमध्ये संयुक्त उपक्रम स्थापन केला. त्यासाठी केलेल्या करारात रिलायन्सची भागिदारी आहे. केंद्र सरकारने रिलायन्स एअरोस्ट्रक्‍चर लिमिटेडच्या या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. येथे पहिल्या टप्प्यात विमान, इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम, रडार, मनुष्यविरहित हवाई वाहनांच्या उत्पादनांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांची देखभाल करण्याचा रिलायन्सचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाला पूरक उद्योगही उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पात दहा हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची शक्‍यता आहे.

संरक्षण विभागाने मिहान परिसरात गजराज प्रकल्पासाठी जागा आरक्षित केली होती. मात्र, साठ वर्षांत या जागेचा उपयोगच केला नाही. मिहान प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर गजराजला पर्यायी जागा देऊन त्यांची जागा अधिग्रहित करण्यात आली. दरम्यान, गजराज प्रकल्प नागपूरमधून पंजाबला हलविण्यात आला आहे. मात्र, रिलायन्सच्या एरोस्पेस पार्कमुळे पुन्हा संरक्षण विभागात नागपूरचे स्थान महत्त्वाचे राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com