खनिज निधीतील कामाचे अंकेक्षण करा - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागपूर - जिल्ह्याला खनिज प्रतिष्ठानकडून मिळणाऱ्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रीकरण करावे. कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अंकेक्षण करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

नागपूर - जिल्ह्याला खनिज प्रतिष्ठानकडून मिळणाऱ्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रीकरण करावे. कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अंकेक्षण करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

खनिज निधीच्या कामांचा आढावा शनिवारी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, समीर मेघे, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सीईओ कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते. जिल्ह्याला खनिज निधीतून 116 कोटी उपलब्ध होत आहे. यापैकी 86 कोटींचे नियोजन झाले आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, महिला बालकल्याण, शिक्षण, आदिवासी कल्याण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांना 10 टक्के निधीचे वाटप केले आहे. जिल्ह्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदच्या शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. याशिवाय खाण बाधित क्षेत्रात अधिक निधी वाटप करून विकास करण्यात येणार आहे. खनिकर्मच्या निधीसाठी केंद्र शासनाने परिपत्रकातून या निधीतून कोणत्या योजना घेता येतात व निधी वितरण कसे करायचे या संबंधीचे मार्गदर्शन केले आहे. त्या परिपत्रकानुसारच कामे करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. 

गोंडवाना संग्रहालय गोरेवाड्यात 
आदिवासींचे गोंडवाना संग्रहालय (म्युझियम) गोरेवाड्यात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गोंडवाना संग्रहालयासाठी शासनाने 24 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. परंतु, चार वर्षांपासून जागा उपलब्ध झाली नाही. गोरेवाड्यात जागा उपलब्ध होणार असल्यामुळे गोरेवाडा येथे हे संग्रहालय करण्यात येणार आहे. 

दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी 100 कोटी 
दीक्षाभूमी "अ' वर्ग पर्यटन स्थळ आहे. दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच तो शासनाकडे पाठवून उच्चस्तरीय बैठकी घेतली जाणार आहे. या कामांमध्ये व्यासपीठ, दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, सुरक्षारक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्रमा, दगडी पथपथ, भाविकांसाठी सुविधा क्षेत्र, प्रसाधने, पिण्याच्या पाण्याची सविधा, विद्युतीकरण, सौर ऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तूपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, ऑडिओ सिस्टिम, किरकोळ कामे आदींचा समावेश केला आहे. 

Web Title: nagpur news Mineral Fund Chandrashekhar Bawankule