कामगार रुग्णालयावर येणार अवकळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात 31 मे 2018 रोजी एकाच वेळी 500 वर वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. यामुळे रुग्णेसेवेत मोठा अडथळा निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्नित राज्य कामगार योजनांच्या रुग्णालयातील 19 तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी निवृत्त होणार असल्याने कामगार रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याचे संकेत मिळाले आहेत. 

राज्य कामगार योजनेअंतर्गत विदर्भातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारीपेठेतील राज्य कामगार रुग्णालयाचाच आधार आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी योग्य आरोग्य सुविधा पुरविणे अडचणीचे झाले आहे. त्यात 2015 मध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 करण्याचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला होता. या अध्यादेशाची मुदत 31 मे 2018 पर्यंतच आहे. यामुळे राज्यातील 500 वर डॉक्‍टर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यात कामगार रुग्णालयांच्या 19 तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांच्या जागी दुसरे अधिकारी सध्यातरी तत्काळ नियुक्त करता येणे शक्‍य नाही. सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयात एकमेव असलेल्या फिजिशियनही निवृत्त होणार आहेत. यामुळे येथील आरोग्यसेवेवर अवकळा पसणार, हे मात्र नक्की. 

कामगार रुग्णालय फिजिशियनविना 
राज्य कामगार विमा योजनेच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयात कधीकाळी दोन फिजिशियन होते. यातील एक निवृत्त झाले. यामुळे सध्यातरी एकाच फिजिशियनच्या भरोशावर कामगार रुग्णालयात रुग्णसेवेचा डोलारा सांभाळला जात आहे. येत्या 31 मे 2018 रोजी त्या सेवानिवृत्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे कामगार रुग्णालय फिजिशियनविना असणार आहे. 

वय वाढविण्यात यावे - त्रिशरण सहारे 
वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 करण्यासंदर्भातील अध्यादेशाची मुदत 31 मे 2018 रोजी संपणार आहे. यामुळे राज्यातील कामगार रुग्णालयांसह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्हा रुग्णालयातील सेवा कोलमडण्याचे संकेत लक्षात घेता या अद्यादेशाची मुदत वाढविण्यासंदर्भात नवीन अद्यादेश काढून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे (इंटक) यांनी केली. 

Web Title: nagpur news more than 500 medical officers and senior officers will be retired