पैसे संपल्यामुळे चित्रपटांमध्ये आलो - पीयूष मिश्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

विपश्‍यना केल्यामुळे बदललो
दहा वर्षांपूर्वी मी फार हेकेखोर स्वभावाचा होतो. कुणाचाही अपमान करायचो, निट बोलायचो नाही. परंतु, दहा दिवस विपश्‍यना केली आणि माझ्यात मोठा बदल झाला. पूर्वी लोक मला  घाबरून स्वीकारायचे. आज माझ्या प्रेमळ स्वभावामुळे स्वीकारतात, अशी कबुली त्यांनी दिली.

नागपूर - ‘दिल्लीमध्ये २००३ पर्यंत थिएटर केले. सिनेमा माझ्यासाठी कधीच पॅशन नव्हता. केवळ जवळचे पैसे संपल्यामुळे चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा निर्णय घेतला, या शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेता, गीतकार-कवी आणि लेखक पीयूष मिश्रा यांनी आपल्या प्रवासाचे वर्णन केले. ‘ॲक्‍टिंग कभी सिनेमाकी या फीर नाटक की मुहताज नही होती’, हे सांगताना अभिनय केला नाही तरी माझे काहीच बिघडत नाही, असेही ते स्पष्ट करतात.

पीन ड्रॉप साउंड आणि मिलीओरिस्ट फिल्म स्टुडियोच्या वतीने आयोजित तीनदिवसीय  एक्‍स्प्रेशन्स लघुपट महोत्सवाचा समारोप रविवारी (ता. ३०) झाला. या वेळी पीयूष मिश्रा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पॅरलल सिनेमा, इंडिपेंडन्ट सिनेमा या संकल्पनांविषयी ते म्हणाले, ‘अशा गोष्टींवर माझा विश्‍वास नाही. आपले मनोरंजन करेल, आपल्याला हसायला किंवा रडायला भाग पाडेल, तो सिनेमा. आपण कलेला आयुष्य समजतो, तर ती अधिक कॉम्प्लिकेटेड करण्याची काहीच गरज नाही. साधं सोपं जगतो, तर सिनेमाही तसाच असायला हवा. राजकुमार हिराणीचा ‘थ्री इडियटस्‌’ हा शिक्षण व्यवस्थेवरील सर्वोत्तम चित्रपट मी मानतो. कारण अतिशय सहजतेने तो आपल्याला बरेच काही सांगून जातो. मात्र, फिल्म इन्स्टिट्यूटने लोकांना बिघडवले आहे. तिथला अभ्यासक्रम तर पाच वर्षांचा करायला हवा, अशी हवा काही वर्षांपूर्वी होती. कारण तिथून बाहेर पडल्यानंतरच चित्रपट असा तयार होत नसतो, याची प्रचिती येते. या वेळी आरजे मिलिंद आणि शैलेश नरवाडे यांची उपस्थिती होती.

लाइव्ह परफॉर्मन्स
‘गुलाल’, ‘गॅंग्स ऑफ वास्सेपूर’ यासारख्या चित्रपटांमधील गाणी पीयूष मिश्रा यांनी स्वतः लिहिली आणि गायलीही आहेत. ‘ये दुनिया’, ‘इक बगल में चांद होगा’ या गाण्यांसह कविता, शेरो-शायरी आणि नाटकांसाठी गायलेल्या गाण्यांचा लाइव्ह परफॉर्मन्स पीयूष मिश्रा यांनी दिला. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी खास हार्मोनियमची व्यवस्थाही करण्यात आली होती.

सेन्सॉर बोर्ड आवश्‍यक
सेन्सॉर बोर्ड नसेल, तर ‘जंगलराज’ येईल देशात. तुम्ही भाजपचे लोक असाल किंवा नसाल, पण हा रामाचा देश आहे, हे टाळू शकणार नाही. कारण या देशात आपल्यापेक्षा मोठा माणूस पुढे  आला की आपण वाकून नमस्कार करतो आणि इथली महिला आदराने पदर डोक्‍यावर घेते. ‘ये अपना कल्चर है, असे सांगत सेन्सर बोर्ड आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. 

पुरी जनरल स्टोअर
ओम पुरी यांच्यासारखा नट आजपर्यंत झाला नाही. सकाळी सत्यजित रेच्या चित्रपटाचे आणि सायंकाळी डेव्हीड धवनच्या चित्रपटाचे शूटिंग, केवळ ओम पुरीच करू शकायचे. ‘पुरी जनरल स्टोअर में हर चीज मिलती है, शिफ्ट के पैसे दे के जाओ’, असेही आम्ही गमतीने म्हणायचो, अशी एक आठवणही त्यांनी सांगितली. 

Web Title: nagpur news movie Piyush Mishra entertainment