वीजचोरांवर थेट गुन्हे दाखल करा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागपूर - वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांसोबत तडजोड न करता विद्युत कायद्याच्या कलम 135 मधील तरतुदीनुसार थेट गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे. 

नागपूर - वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांसोबत तडजोड न करता विद्युत कायद्याच्या कलम 135 मधील तरतुदीनुसार थेट गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला या पाचही परिमंडळांतील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंत्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. बरेच ग्राहक बेदरकारपणे वीजचोरी करतात. पकडल्या गेल्यास बदनामीच्या भीतीपोटी लगेच दंड आणि तडजोड शुल्क भरून मोकळे होतात. याशिवाय या वीजचोरीमागील मास्टरमाइंड बिनधोक सुटतो आणि इतर ग्राहकांना वीजचोरी करण्यास मदत करतो. या प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिकाधिक वीजचोरांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केल्यास मास्टरमाइंडची नावेही पुढे येऊन वीजचोरीस मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्‍वास खंडाईत यांनी व्यक्त केला. वीजचोरी पकडताना थातूरमातूर कारवाई न करता महावितरणची विजेच्या युनिट्‌सची विक्री वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. एजन्सीने दिलेल्या मीटर रीडिंगपैकी 5 टक्के नोंदी आपल्या स्तरावर क्रॉसचेक करून मीटर रीडिंग करणाऱ्या एजन्सीची किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामात कुचराई केल्याचे आढळल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करा, असेही निर्देश खंडाईत यांनी दिले. कृषीसह सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाच्या जास्तीतजास्त नोंदी करण्यावर भर द्या. कामाचे योग्य नियोजन केल्यास वीज ग्राहकांना त्यांचा अधिक लाभ होईल. संथ गतीने फिरणाऱ्या मीटरची ऍक्‍युचेक तपासणी करण्यात यावी. वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीला आळा घाला. थकबाकी वसुली करण्यास प्राधान्य देण्याचेही निर्देश खंडाईत यांनी दिले. याप्रसंगी मुख्य अभियंते दिलीप, घुगल, जिजोबा पारधी, किशोर मेश्राम, सुहास रंगारी, अरविंद भादीकर यांच्यासह पाचही परिमंडळांतील अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते. 

कर्मचाऱ्यांचा गौरव 
जुलै महिन्यात प्रशंसनीय कार्य करणारे आलापल्ली आणि वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंते अमित परांजपे आणि उत्तम उरकुडे, चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे यांच्यासह वर्धा येथे 31 लाखांची वीजचोरी उघडकीस आणणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांचा प्रादेशिक संचालक खंडाईत यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

Web Title: nagpur news mseb