थकबाकीदारांना महावितरणचा शॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर - महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी प्रत्येक जनमित्राला दरदिवशी ४ थकबाकीदारांकडील वीजपुरवठा खंडित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत परिमंडळातील नऊ विभागीय कार्यालयांनी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये  एकूण २५ हजारांवर लघुदाब थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला.

आर्थिक विवंचनेचा सामना करणाऱ्या महावितरणने परिस्थिती सावरण्यासाठी थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित करून ‘शॉक ट्रीटमेंट’ दिले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात एकूण १३ हजार ९४३ लघुदाब वीजग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईने धास्तावलेल्या थकबाकीदारांसह इतरांनी ११५ कोटी ५२ लाखांचा भरणा केला. डिसेंबरमध्ये ११ हजार २२८ लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला.

नोव्हेंबर महिन्यात वर्धा विभागाने २ हजार ३९७ लघुदाब वीजग्राहकांचा, आर्वी विभागाने २ हजार २३३ वीजग्राहकांचा, काँग्रेसनगर विभागाने २ हजार १७९ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. डिसेंबरमध्ये आर्वी विभागाने २ हजार ११०, मौदा विभागाने १ हजार ८७० वीजग्राहक, काँग्रेसनगर विभागाने १ हजार ७८६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून थकबाकीदार वीज ग्राहकांसह अन्य वीज ग्राहकाकडून ८६ कोटी ३० लाख वसूल केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाचे कौतुक
थकबाकीदार वीजग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणच्या विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याचा मुख्य अभियंते रफिक शेख यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक अभियंते मनीष वाठ, नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, दिलीप घाटोळ, स्वप्नील गोतमारे, प्रफुल्ल लांडे, हेमंत पावडे, उत्तम उरकुडे, दीपाली माडेलवर, राजेश घाटोळे, डी. एन. साळी, प्रभारी वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अशोक पोईनकर उपस्थित होते.

Web Title: nagpur news MSEB