चल ऊठ रे ‘मुकुंदा’..!

नितीन नायगावकर
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - तीन दशकांपेक्षा अधिक काळ दमदार अभिनयाच्या जोरावर तो रंगभूमी व्यापून टाकतो. प्रत्येकाला आपलेसे करतो. वादविवाद, द्वेश, राजकारणापासून लांब राहतो. ५७ वर्षांचे वय आणि एनर्जी विशीतली. तो थकत नाही आणि सहकलावंतांना थकू देत नाही. कुणालाही असतो तसा मायानगरीचा मोह त्यालाही जडला. पण, तीस वर्षे कौटुंबिक जबाबदारी आणि ‘बाद में देखेंगे’ या दोन कारणांमध्ये निघून गेली. एक दिवस आतून, ‘चल ऊठ रे मुकुंदा’ असा आवाज येतो आणि स्वप्नांना डोळे फुटावे तसे नागपूर सोडण्याचा निर्णय घेतो. 

मुकुंद वसुले या नावाला अभिनयाने ओळख दिली. नाटक असो वा महानाट्य, भूमिका दोन तासांची असो वा दोन मिनिटांची, मुकुंद वसुले लक्षात राहून जातात. गजानन महाराज आणि महात्मा गांधी या दोन भूमिकांमुळे सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचले. तर, नाटकांमधील भूमिकांनी नाट्यरसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. 

अनेक दिग्दर्शकांच्या यादीत मुकुंद वसुले  हेच नाव पहिल्या क्रमांकावर असते. तर, काही लेखक मुकुंद वसुलेंना डोळ्यापुढे ठेवूनच नाटक लिहितात. हा नट लेखक आणि दिग्दर्शकांच्या डोक्‍यात भिनलाय. १९८२ मध्ये डाकलेखा विभागात नोकरी आणि त्याचवर्षी नाट्यक्षेत्रात पदार्पण, अशा दोन चांगल्या घटना घडल्या. तेव्हापासून आजपर्यंत नोकरी सांभाळत अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.  चित्रपटांच्या ऑफर्स येऊनही त्या स्वीकारता आल्या नाहीत. दहा वर्षांपूर्वी ‘गाभ्रीचा पाऊस’ या चित्रपटात भूमिका साकारली आणि त्यानंतर सातत्याने कामे येत गेली.  त्यात दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘बाबू बॅंड बाजा’ हा चित्रपट चालून आला आणि त्यांनी तो गाजवलाही. आता चित्रपटांच्या ऑफर्सचा ओघ अधिकच वाढला होता. पण, नोकरी सांभाळायची की चित्रपट करायचे, असा प्रश्‍न होता. अखेर सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मोठा मुलगा हर्षद रोबोटिक्‍स इंजिनिअरिंगमध्ये, तर धाकटा पीयूष याने हॉटेल व्यवसायामध्ये पाऊल टाकलेय. दोघेही पुण्यात स्थायिक झालेत. मुकुंदाच्या सोबतीला माधवी असतेच, तशी पत्नीची साथ नाटकाचा प्रयोग असो वा पुरस्कार सोहळा असो, प्रत्येक ठिकाणी असते. त्यांच्या कौतुकाचे कित्येक सोहळे माधवी यांच्या भारावलेल्या डोळ्यांनी साठवले आहेत. मुलं पुण्यात असल्यामुळे सेवानिवृत्ती घेऊन तिथेच स्थायिक व्हायचे, जेणेकरून चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स केवळ जबाबदारीच्या कारणाने नाकारण्याची वेळ येणार नाही, असा विचार मुकुंद वसुले यांनी केला. हल्लीच मोहन आगाशे यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका असलेल्या एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. पुण्यापासून स्वप्नांची मायानगरी जवळ आहे. येत्या दोन महिन्यांत पुण्यातील नवीन घरात मुकुंद वसुले शिफ्ट होतील. स्पर्धेच्या नाटकात दिसणार नाहीत, पण पडद्यावरील स्पर्धेत नक्कीच दिसतील. चित्रपटांची वाट धरायला उशीर झालाय खरा, पण समाधानाची वाट त्यांना योग्यवेळी गवसली...हेही नसे थोडके.

Web Title: nagpur news mukund vasule