मनपाचे १०० कोटी पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

थकबाकी वसूल करण्यासाठी दोनदा अभय योजना सुरू करण्यात आली. नागरिकांना दंड माफ करून निव्वळ थकबाकी भरण्याची संधी दिली होती. यातून २५ कोटीवर थकीत वसूल झाले. त्यानंतर थकबाकीदारांची नळजोडणी बंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या भीतीने थकबाकीदारांनी ४ कोटी रुपये भरले. ज्यांनी थकबाकी दिली नाही, त्यांची नळजोडणी बंद करण्यात आली. 
- सचिन द्रवेकर, प्रवक्ते, ओसीडब्ल्यू.

नागपूर - शहरातील पावणेदोन लाख नागरिक, संस्थांनी महापालिकेच्या पाणी करापोटी १०० कोटी थकविले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रक्कम थकीत असून, ते बुडीत असल्याचेच चित्र आहे. विशेष म्हणजे थकीत करासाठी नागरिकांची नळजोडणी बंद करणाऱ्या मनपाकडे ४७ लाख रुपये थकीत असून, अनेक मोठ्या धेंड्यांसह नियमावर बोट ठेवून कामे करीत असल्याचा कांगावा करणाऱ्या संस्थांकडेही कोट्यवधींची थकबाकी असल्याने वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहराला पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला दरवर्षी कच्च्या पाण्याची खरेदी, शुद्धीकरण, वितरण आदींसाठी दीडशे कोटींवर खर्च आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जेवढा खर्च येतो, तेवढी वसुलीही नसल्याचे दिसून येते. त्यात नागरिकांसोबतच कोट्यवधींचा व्यवसाय करीत असलेल्या संस्थाही पाणी कर भरत नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मनपाच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. शहरात १ लाख ६९ हजार २५० नागरिक व संस्थांकडे पाणी कर थकीत आहेत. यात ११७ थकबाकीदारांकडे पाच लाखांपेक्षा जास्त थकीत असून, यात २५ लाख  ते ३७ कोटींपर्यंत थकीत असलेल्यांत १७ जणांचा समावेश आहे. या सतरा जणांकडे ६४ कोटी ३ लाख ३३ हजार ९७० रुपये थकीत आहेत. यात सर्वाधिक ३७ कोटी ९५ लाख ८१ हजार  ४८२ रुपये एएसएल इंडस्ट्रीजकडे थकीत आहे. त्यापाठोपाठ रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजकडे ५ कोटी २ लाख ६५ हजार ६६४ रुपये थकीत आहेत. महापालिकेच्या नरसाळा येथील पाणीपुरवठा केंद्राकडे ३ कोटी ५० लाख २८ हजार रुपये थकीत आहे. २५ लाखांवर थकबाकी असलेल्या केवळ १७ जणांवर ६४ कोटींची थकबाकी असून १ लाख ६९ हजार  २३३ जणांवरील थकबाकीची रक्कम १०० कोटींवर जाण्याची शक्‍यता आहे. यात पोलिस मुख्यालय (४० लाख २४ हजार २२ रुपये) विभागीय आयुक्त कार्यालय (४३ लाख ४ हजार, ६३३ रुपये), मनपा इंदिरा गांधी रुग्णालय (२९ लाख १२ हजार ४ रुपये) एमएसईबी  (२० लाख १० हजार ६६८ रुपये) पोलिस आयुक्त कार्यालय (१९ लाख ९३ हजार ४३५) या दररोज नागरिकांना नियमाचे धडे देणाऱ्या संस्थांचाही समावेश आहे. 

२५ लाखांवर थकबाकी 
थकबाकीदार                               थकीत रुपये

१) एएसएल इंडस्ट्रीज           ३७,९५,८१,४८२ 
२) रामदेवबाबा इंजिनिअरिंग       ५,०२,६५,६६४
३) मनपा नरसाळा पाणीपुरवठा     ३,५०,२८,६०१
४) सेक्रटरी, हॉस्पिटल             १,८०,१७,२८५
५) ट्रस्ट इंजिनिअर एनआयटी कॉलनी  १,०५,०१,१३८
६) एनआरसीसी कॉलनी               ६९,०२,८२६
७) विजयानंद सोसायटी               ५९,०६,१७४
८) नागपूर गृहनिर्माण संस्था           ५०,३२,१४९
९) पीडब्ल्यूडी, न्यू तहसील            ४८,४४,७९९
१०) सचिव, मनपा                    ४७,३०,१४०
११) पूनम चेंबर्स                      ४३,९६,७५६
१२) विभागीय आयुक्त                ४३,०६,४३३
१३) पोलिस मुख्यालय                ४०,२४,०२२
१४) जवाहर विद्यार्थी गृह              ३९,१३,२४१
१५) मनपा इंदिरा गांधी रुग्णालय       २९,१२,०२९ 
१६) गिगेव रिअल इस्टेट              २८,८०,९७८
१७) विजयालक्ष्मी व्ही. कालवा एजन्सी २५,८००४१ 

रुपये आणि एकूण थकबाकीदार 
थकीत (रुपये)    थकबाकीदारांची संख्या 

१ हजारपेक्षा कमी                  ६६,५३८
१००० ते १००००               ८१,८०६
१०००० ते ५००००             १५,५३३
५०००१ ते १ लाख               ३,८७३
१ लाख ते ५ लाख                 १,३८७
५ लाख ते २० लाख               ९६
२० लाख ते १ कोटी               ११२
१ कोटीपेक्षा जास्त                   ५

Web Title: nagpur news municipal 100 crore loss