वैष्णवी, मितालीच्या डोक्‍यावरील छत्र हिरावले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर - "विवेक' गमावलेल्या आरोपीने बहीण, जावई, भाची व बहिणीच्या सासूला संपविले. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर पोटच्या गोळ्याचाही खात्मा केला. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेतून मिताली व वैष्णवी बचावल्या. परंतु, उमलत्या वयातच दोघींनीही आई-वडिलांची माया, भाऊ-बहिणीचे प्रेम असे सर्वच गमावले आहे. 

नागपूर - "विवेक' गमावलेल्या आरोपीने बहीण, जावई, भाची व बहिणीच्या सासूला संपविले. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर पोटच्या गोळ्याचाही खात्मा केला. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेतून मिताली व वैष्णवी बचावल्या. परंतु, उमलत्या वयातच दोघींनीही आई-वडिलांची माया, भाऊ-बहिणीचे प्रेम असे सर्वच गमावले आहे. 

कमलाकर पवनकर कुणाच्याही मदतीला धावून जायचे. यामुळे ते सर्वपरिचित होते. मेहुणा विवेक पालटकर यालासुद्धा वेळोवेळी मदत करायचे. पत्नीच्या खुनात पोलिसांनी विवेकला अटक केल्यापासून त्याच्या दोन्ही मुलांना पवनकर यांनी आपल्याजवळ ठेवले. आपल्या मुलांप्रमाणेच त्यांचे संगोपन केले. मुलांचे संगोपन करणाऱ्यांचे पांग फेडण्यापेक्षा उलट्या काळजाच्या विवेकने त्यांचा खात्मा केला. दुसऱ्या खोलीत झोपलेल्या पवनकर यांची मुलगी वैष्णवी (6) आणि विवेकची मुलगी मिताली (10) या दोघीच हत्याकांडातून बचावल्या. दोघींनीच सर्वप्रथम रक्ताने माखलेले मृतदेह बघितले आणि हत्याकांडाला वाचा फुटली. 

दोघींनी सर्वस्व गमावले 
वैष्णवीने आई-वडील, बहीण, आजी असे जवळचे सर्वच नातेवाईक गमावले. मितालीचीही स्थिती वेगळी नाही. तिने पूर्वीच आई गमावली आहे. या घटनेत भावाला गमावले. वडीलच आरोपी असल्याने तो पुन्हा भेटणे नाही. 

हाच माझ्या पोराचा घात करील... 
मीराबाई यांचा विवेकच्या घरी येण्याला प्रारंभापासूनच विरोध होता. हा माणूसच माझ्या मुलाचा घात करील, हे वाक्‍य त्या नेहमीच बोलून दाखवायच्या. त्यांची शंका खरी ठरली. ही आठवण करीत पवनकर कुटुंबीयांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

"होय, पप्पाच होते' 
विवेक मोटारसायकलने रात्री उशिरा पवनकर यांच्या घरी आला. तोवर बच्चेकंपनी झोपी गेली होती. मितालीने मात्र वडील आल्याचे बघितले होते. दोन्ही बचावलेल्या मुलींमध्ये मितालीच मोठी असल्याने प्रारंभी पोलिस आणि नंतर नातलगांकडून तिलाच विचारणा करण्यात येत होती. "रात्री पप्पाच आले होते. त्यांच्या सोबत कुणी आले होते की नाही याबाबत माहिती नाही. परंतु, सकाळी पप्पा नव्हते. सर्वचजण खोलीत रक्तात पडले होते,' अशी माहिती तिने दिली. 

म्हणून वैष्णवी बचावली 
वैष्णवी सर्वांत धाकटी असल्याने आई-वडिलांजवळ झोपायची. रविवारी रात्री मात्र तिने आजी आणि मितालीसोबत झोपण्याचा आग्रह धरला. नाइलाजाने कृष्णा आत्या मामाजीच्या खोलीत झोपायला गेल्या. विवेकने कोणताही विचार न करता खोलीत झोपलेल्या सर्वांचाच खून केला. वैष्णवी बचावली पण नकळतपणे उलट्या काळजाच्या आरोपीने मुलाच्याच डोक्‍याचा भुगा उडविला. 

मितालीच्या वाट्याला उपेक्षा 
आईच्या प्रेमाला पोरकी झाल्यानंतर मायेची सावली देणाऱ्या आत्या-मामाजींना प्रारब्धाने हिरावून नेले. दोन्ही घटनांमध्ये जन्मदाता बापच खलनायक ठरला. कोणताही दोष नसताना स्वकीयांची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदललेली दिसली. वैष्णवीला जवळ घेऊन गोंजारले जात होते. परंतु, मिताली एकटी पडलेली दिसली. 

Web Title: nagpur news murder case

टॅग्स