पार्किंगच्या वादातून अभियंत्याचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

नागपूर - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याशी कारच्या पार्किंगवरून दोघांशी वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याचा लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून खून केला. ही थरारक घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशीष केशवराव कांबळे (वय 37, रा. खामला) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

नागपूर - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याशी कारच्या पार्किंगवरून दोघांशी वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याचा लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून खून केला. ही थरारक घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशीष केशवराव कांबळे (वय 37, रा. खामला) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

आशीष कांबळे हे नाशिक येथील विशाखा टेक्‍नॉलॉजी या कंपनीत टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर म्हणून नोकरीला होते. कंपनीतील सहकारी ऋतुराज नंदकिशोर भादवीकर (वय 32, जेल रोड, नाशिक) यांना घेऊन नाशिकहून नागपुरात आले होते. रविवारी रात्री जेवण करण्यासाठी बाहेर जाण्याचा दोघांनी बेत आखला. ऋतुराज आणि आशीष रात्री कारने गोळीबार चौकात असलेल्या ओम शक्‍ती भोजनालयात आले. रस्त्याच्या कडेला एका घरापुढे त्यांनी कार पार्क केली. रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलमधून जेवण करून दोघेही बाहेर आले. पार्क केलेली कार काढत असताना आरोपी अतुल रामदास सदावर्ते (वय 29, गोळीबार चौक) आणि स्वप्निल शरद महाजन (वय 31, इतवारी) यांनी त्यांना थांबवले. कार येथे पार्क का केली? असा जाब विचारला. आशीष आणि ऋतुराज यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली. नंतर स्वप्निल आणि अतुल यांनी दोघांनाही जबरदस्त मारहाण केली. छातीवर जबर ठोसे लगावल्यामुळे आशीष बेशुद्ध पडले. त्यांच्या नाकातोंडातून रक्‍त निघत होते. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. 

ही घटना बघून भोजनालयातून काही युवक धावत बाहेर आले. त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून आशीष यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ऋतुराज यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

रात्री उशिरापर्यंत सावजी सुरू 
स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने या परिसरातील अनेक सावजी हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. शिवाय या हॉटेलमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत असतात. सावजी खानावळींमुळे शहरात गुन्हेगारी वाढत आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यामुळेच सावजी खानावळी रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, अशी चर्चा या हत्याकांडामुळे सुरू झाली आहे. 

सावजीमुळे नागरिक त्रस्त 
शहरात रात्री उशिरापर्यंत सावजी खानावळींमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू असते. रात्री उशिरापर्यंत येथे दारुड्यांचा गोंधळ सुरू असतो. त्यामुळे सावजी भोजनालयाजवळील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, पोलिसच सावजींना संरक्षण देत असल्यामुळे तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांनी पडत आहे. 

Web Title: nagpur news murder case