मुख्य आरोपी मेश्रामसह तिघे पोलिसांना शरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नागपूर - तडीपार असलेल्या दोन गुंडांचा सुपारी घेऊन खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपी गणेश मेश्राम व त्याचे दोन साथीदार नंदनवन पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. त्यांनी हत्याकांडाची कबुली दिली. अन्य दोन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा पोलिस आणि नंदनवन पोलिसांची चार ते पाच पथके आरोपींच्या शोधात शहरभर फिरत होती. मात्र, आज सायंकाळी तीनही आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. मन्या वैद्य आणि सुमित सतीश चव्हाण अशी अन्य दोन साथीदारांची नावे आहेत.

पोलिस सूत्रानुसार, बादशहा ऊर्फ संजय कंदई बनोदे (वय ३५, रा. पांढराबोडी) आणि बादल संजय शंभरकर (वय ३०, रा. कुंजीलालपेठ, आंबेडकरनगर) हे दोघेही तडीपार होते. अजनी पोलिसांच्या आशीर्वादाने तडीपार बादशहा कुंजीलालपेठमध्ये पत्नीसह राहत होता. मंगळवारी पहाटे चार वाजता बादशहा बनोदे, बादल शंभरकर आणि राजेश यादव हे तिघे दुचाकीने खरबीतील लक्ष्मी रेस्टॉरेंटसमोरून जात होते. दरम्यान, मुख्य आरोपी गणेश मेश्राम, मन्या वैद्य आणि सुमित चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी बादशहाच्या दुचाकीला कारने धडक दिली. तिघेही खाली पडल्यानंतर रॉडने तिघांच्याही डोक्‍यावर हल्ला केला. तिघेही ठार झाल्याचे समजून आरोपी पळून गेले. मात्र, पोलिसांची कुमक पोहोचल्यामुळे राजेश यादव हा वाचला. त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. 

नंदनवनमध्ये गुन्हेगारी वाढली
अनेक मोठमोठ्या आरोपींसाठी नंदनवन परिसरात खुले रान ठरले आहे. क्रिकेट सट्टा आणि जुगार अड्ड्यासाठी नंदनवनला ओळखले जाते. पोलिस निरीक्षकांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगारांना निवाऱ्यासाठी ठिकाण म्हणजे नंदनवनचा उल्लेख केला जातो. तडीपार गुंडांचा मुक्‍त वावर हुडकेश्‍वर, अजनी आणि नंदनवन परिसरात असतो. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कर्मचारी कारवाई करू शकत नसल्याची माहिती आहे. 

पोलिसांचे अपयश 
दुहेरी हत्याकांड घडल्याच्या २४ तासांपर्यंत नंदनवन पोलिसांना आरोपींबाबत कोणताही सुगावा लागला नाही. शेवटी आरोपींनी नियोजनाप्रमाणे पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. आरोपी स्वतःहून ठाण्यात आल्यामुळे नंदनवन पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली. पोलिसांना आरोपी गवसत नाहीत, असा चुकीचा संदेश या निमित्ताने जात आहे. 

उर्वरित आरोपी राज्याबाहेर
बादशहा आणि बादल या दोन्ही आरोपींची विक्‍की नावाच्या युवकाने सुपारी देऊन खून केल्याची माहिती आहे. या दोन्ही आरोपींना विक्‍कीने एका अन्य राजकीय व्यक्‍तीच्या खुनाची सुपारी देण्यात आली होती. मात्र, पैसे घेतल्यानंतरही काम न केल्यामुळे विक्‍कीने त्या दोघांचीच सुपारी दिल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

Web Title: nagpur news murder case police