यादव कोहचाडेचा कारागृहात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गाजलेल्या गुणवाढ आणि बोगस पदवी घोटाळ्यातील मुख्य आरोपी यादव नत्थूजी कोहचाडे याचा गुरुवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच त्याला न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. कोहचाडेच्या अचानक मृत्यूने अनेक शंकाकुशंका व्यक्त होत आहे. 

नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गाजलेल्या गुणवाढ आणि बोगस पदवी घोटाळ्यातील मुख्य आरोपी यादव नत्थूजी कोहचाडे याचा गुरुवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच त्याला न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. कोहचाडेच्या अचानक मृत्यूने अनेक शंकाकुशंका व्यक्त होत आहे. 

गुणवाढ प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याला सात लाख रुपयांची लाच  देताना पोलिसांनी कोहचाडेला अटक केली होती. यामुळे विद्यापीठातील गुणवाढ व बोगस पदवी घोटाळा उघडकीस आला. गुणवाढ घोटाळ्यात अनेक बडे प्रस्थ गुंतले असल्याने संपूर्ण  महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गुणवाढीची एकूण शंभर प्रकरणे समोर आली. १९ जून १९९९ साली हे प्रकरण घडले होते. यामुळे संपूर्ण देशभर नागपूर विद्यापीठाची बदनामी झाली होती. नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांकडेही संशयाने बघितले जात होते. अनेकांना नोकऱ्याही नाकारण्यात आल्या होत्या. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्कालीन प्र-कुलगुरू योगानंद काळे यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा भालचंद्र चोपणे कुलगुरू होते. 

१९ जुलै १०९९ रोजी नागपूर विद्यापीठात पदवी घोटाळा उघडकीस आला होता. १८ जुलै १९९९ रोजी पोलिस तपास अधिकारी अनिल लोखंडे याला ७ लाख रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विद्यापीठाने प्रकरण उघडकीस येतास कोहचाडेला निलंबित केले होते. २००६ साली विशेष न्यायालयाने त्याला लाच प्रकरणात दोषी ठरविले. त्यानंतर विद्यापीठाने त्याला २००७ साली बडतर्फ केले. या विरोधात कोहचाडेने कोर्टात धाव घेतली होती. तब्बल अठरा वर्षांनंतर (१९जुलै २०१७)  न्यायालयाने त्याला चार वर्षे कारावास व ५० हजारांचा दंड व दंड न भरल्यास ६ महिने  अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. आज  दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्याला कारागृहात अचानक भोवळ आल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. कारागृहातील रक्षकांनी त्याला लगेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. नागपूर कारागृहातून मिळालेल्या सूचनेवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

चर्चेला उधाण
विद्यापीठातील सूत्रांच्या दाव्यानुसार कोहचाडे कारागृहात पुस्तक लिहिणार होता. पुस्तकातून अनेकांची गुपिते उघड होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. अशातच कोहचाडेचा मृत्यू झाल्याने शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे. विद्यापीठ राजकारणातील एक बड्या नेत्याने फेसबुकवरही तशा आशयाची टाकलेली पोस्ट रात्री व्हायरल झाली. यानंतर आणखीच चर्चेला ऊत आला होता.

एक प्रकरण अद्याप प्रलंबित
नागपूर विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय सुरू करण्यात आले होते. गुणवाढ प्रकरणाच्या एका प्रकरणात २००६ मध्ये न्यायाधीश गट्टामी यांनी कोहचाडेला शिक्षा सुनावली होती. हायकोर्टातदेखील ही शिक्षा कायम होती. या शिक्षेच्या विरोधात कोहचाडे याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण प्रलंबित असतानाच कोहचाडेचा मृत्यू झाला,  हे येथे उल्लेखनीय!

Web Title: nagpur news Nagpur Central Jail