सिमेंट रस्ता कंत्राटदाराला महापालिकेचा धक्का 

राजेश प्रायकर 
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे मंदगतीने करीत नागरिकांना मनस्ताप सहन करण्यास भाग पाडणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने दंडास्त्र उगारले आहे. कार्यादेश देऊनही अद्याप काही कंत्राटदाराने कामे सुरू केली नसल्याचेही महापालिकेच्या निदर्शनास आले असून, दिशा डायनॅमिक या कंत्राटदार कंपनीला दंड ठोठावला. हा दंड कंपनीला देय रकमेतून वसूल  केला जाणार आहे. 

नागपूर - शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे मंदगतीने करीत नागरिकांना मनस्ताप सहन करण्यास भाग पाडणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने दंडास्त्र उगारले आहे. कार्यादेश देऊनही अद्याप काही कंत्राटदाराने कामे सुरू केली नसल्याचेही महापालिकेच्या निदर्शनास आले असून, दिशा डायनॅमिक या कंत्राटदार कंपनीला दंड ठोठावला. हा दंड कंपनीला देय रकमेतून वसूल  केला जाणार आहे. 

शहरातील अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट असून, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे सिमेंट रस्त्यांसाठी कार्यादेश देऊनही कंत्राटदारांनी कामे सुरू न  केल्याने या रस्त्यांवरील खड्डेही महापालिकेला बुजविता येत नाही. परिणामी नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहे, याकडे ‘सकाळ’ने ३१ जुलैच्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केले.  या वृत्तांची दखल घेत महापालिकेने कंत्राटदारांवर दंडाच्या कारवाईस सुरुवात केली. सिमेंट रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या यादीतील दिशा डायनॅमिक या मुंबईच्या कंत्राटदार कंपनीला महापालिकेने फेज-२ मधील पॅकेज तीनमध्ये तीन रस्त्यांची कामे दिली होती. रामनगर ते दक्षिण अंबाझरी मार्ग, गायत्री मंदिर व महात्मा गांधी स्कूल ते एलएडी चौक, असे तीन रस्त्यांची कामे करण्यासाठी या कंपनीला जून २०१६ मध्ये कार्यादेश दिले होते. या तीन रस्त्यांपैकी केवळ महात्मा गांधी स्कूल ते एलएडी चौकपर्यंतचे काम या कंपनीने सुरू केले असून तेही कासवगतीने सुरू असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही कामांबाबत गाभीर्य न दाखविल्याने महापालिकेने या कंत्राटदार कंपनीवर प्रतिदिवस दोनशे रुपये दंड ठोठावली. दंडाची  ही रक्कम कंपनीच्या अंतिम देयकातून वसूल केले जाणार असल्याचे महापालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिनवार यांनी ‘सकाळ’शी नमूद केले. महापालिकेची इतर कंत्राटदार कंपन्यांवरही नजर असून, त्यांच्यावरही नोटीस व त्यानंतर दंडाची कारवाई केली जाणार आहे.

‘युनिटी’कडून सात महिन्यांचे आश्‍वासन 
ग्रेट नाग रोड सिमेंट रोडचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. युनिटी इन्फ्रास्ट्रक्‍चरला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाच्या गतीबाबत मनपा व या कंपनीत वादही झाला होता. अखेर आर्बिट्रेटरच्या मध्यस्थीने वाद निवळला असला तरी ग्रेट नाग रोडचे धंतोली रेल्वे पूल ते आशीर्वाद टॉकीज चौकापर्यंतचे काम शिल्लक असल्याने नागरिकांना खड्ड्यातून कसरत करावी लागत आहे. या कंपनीने आता सात महिन्यांत संपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

केवळ निम्म्या रस्त्यांची कामे सुरू 
महापालिकेने शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी वेगवेगळे फेज सुरू केले. फेज-१ मध्ये २५ किमी सिमेंट रस्ते होते. यापैकी केवळ १०.५३ टक्के रस्ते पूर्ण झाले असून, अद्यापही १५ टक्के रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. फेज-२ मध्ये ७०.८८ किमीचे रस्ते असून यातील ३५ किमीची कामे सुरू आहेत. अर्थात, दोन्ही टप्प्यांतील केवळ निम्मे कामे झालीत किंवा सुरू आहेत. त्यामुळे नागपूरकरांना आणखी काही वर्षे ही कामे पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: nagpur news nagpur municipal corporation contractor cement road