महापालिकेत 201 पदे भरणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नागपूर - महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार पहिल्या टप्प्यात 201 पदे भरण्यास राज्य शासनाने शनिवारी (ता. 20) हिरवी झेंडी दिली. ही पदे भरल्यानंतर महापालिकेला महिन्याला येणाऱ्या 7.53 कोटींच्या खर्चालाही राज्य शासनाने मान्यता दिल्याने शहर विकास तसेच स्वच्छतेच्या कामांत आणखी सुधारणा होणार आहे. 

नागपूर - महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार पहिल्या टप्प्यात 201 पदे भरण्यास राज्य शासनाने शनिवारी (ता. 20) हिरवी झेंडी दिली. ही पदे भरल्यानंतर महापालिकेला महिन्याला येणाऱ्या 7.53 कोटींच्या खर्चालाही राज्य शासनाने मान्यता दिल्याने शहर विकास तसेच स्वच्छतेच्या कामांत आणखी सुधारणा होणार आहे. 

महापालिका सभागृहाने 17 हजार पदांचा नवीन आकृतिबंध मंजूर केला होता. नव्या आकृतिबंधात सर्वच विभागांत पदे वाढविण्यात आले आहेत. हा आकृतिबंध राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला. मात्र, राज्य शासनाने महापालिकेची आर्थिकस्थिती डळमळीत असल्याने याकडे कानाडोळा केला. मात्र, शनिवारी यासंबंधात मुंबईत मंत्रालयात महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल व राज्य शासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक पाऊले टाकण्यात आली. 

संपूर्ण आकृतिबंधानुसार भरती केल्यास महापालिकेवर 50 कोटी रुपये प्रतिमहिन्याचा ताण पडण्याची शक्‍यता आहे. महापालिकेची आर्थिकस्थिती बघता 50 कोटींचा खर्च करणे शक्‍य नसल्याने आवश्‍यकतेनुसार पदभरतीचा तोडगा काढला. महिन्याला सात कोटी 53 लाखांचा खर्च येणार असून, यालाही मान्यता दिली. 201 पदांमध्ये स्वच्छ भारत मोहिमेच्या अनुषंगाने आरोग्य विभागात तसेच अभियंत्यांची पदे भरली जाणार आहे. 

17 हजार पदांचा आकृतिबंध 
नव्या आकृतिबंधात उपायुक्तांची 7, शहर अभियंता 9, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)- 28, प्रोजेक्‍ट मॅनेजर -1, उपअभियंता (स्थापत्य)- 94, कनिष्ठ अभियंता 302, निरीक्षक- 233, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- 448, मलेरिया सर्व्हे वर्कर- 100, सुरक्षारक्षक- 440, क्षेत्र कर्मचारी- 500, रोड सफाई कर्मचारी- 8,660, पोलिस कॉन्स्टेबल- 45 यासह अन्य पदांच्या संख्येतही वाढ केली आहे. जुन्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील एकूण पदांची संख्या 12 हजार 625 असून, नव्या आकृतिबंधात तीन हजार 18 पदे व्यपगत झाली आहे. नव्या आकृतिबंधानुसार पदांची संख्या 17 हजार 334 आहे. 

नासुप्रसंबंधात मागितला अहवाल 
नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीपूर्वी मालमत्ता, जमीन तसेच कर्मचाऱ्यांचे समायोजन महापालिकेत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भातही मंत्रालयात खल झाला. जमीन, मालमत्ता हस्तांतरणासंदर्भात मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल तसेच नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांना अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. दोन्ही अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर नासुप्र बरखास्तीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: nagpur news nagpur municipal corporation recruitment