विद्यापीठाचे तीस दिवसांत ९० टक्के निकाल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - राज्यातील इतर विद्यापीठांमधील निकालांवर राज्यपालांकडून ताशेरे ओढले  जात असताना, नागपूर विद्यापीठाची निकालाची गाडी सुसाट धावली आहे. यंदा ३१ जुलैच्या आत सर्व निकाल लावण्यात विद्यापीठाला यश आले असून, तीस दिवसांत ९० टक्के निकाल  लावण्याचा विक्रम विद्यापीठाने केला असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर - राज्यातील इतर विद्यापीठांमधील निकालांवर राज्यपालांकडून ताशेरे ओढले  जात असताना, नागपूर विद्यापीठाची निकालाची गाडी सुसाट धावली आहे. यंदा ३१ जुलैच्या आत सर्व निकाल लावण्यात विद्यापीठाला यश आले असून, तीस दिवसांत ९० टक्के निकाल  लावण्याचा विक्रम विद्यापीठाने केला असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षा आणि निकाल डोकेदुखी ठरत असल्याने दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने ‘आयटी रिफॉर्म’ करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकनावर भर देण्यात आला. त्यासाठी परीक्षा भवनात अत्याधुनिक मूल्यांकन केंद्र उभारण्यात आले. याशिवाय प्राध्यापकांना  थेट ‘स्कॅन’ उत्तरपत्रिका देत, त्याचे मूल्यांकन ‘स्क्रीन’वर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला या प्रणालीचा वापर करण्यात प्राध्यापकांना बराच उशीर लागायचा. त्यामुळे २०१६ मध्ये हिवाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागले. त्यानंतर मूल्यांकन प्रक्रियेत आलेल्या त्रुटी दूर करून उन्हाळी परीक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

विद्यापीठाच्या एक हजार २९४ उन्हाळी परीक्षांपैकी ९६९ परीक्षांचे मूल्यांकन करण्यात आले. यातील ८२१ निकाल तीस दिवसांत लावण्यात आले. ९९ निकाल ४५ दिवसांत तर केवळ १ टक्के निकाल ४५ दिवसानंतर लागले. तीन निकाल प्रक्रियेत असून, २९ निकाल थेअरी गुणांमुळे अडकले आहेत. २९ निकाल अद्याप घोषित व्हायचे आहेत. २०१४ आणि १५ मध्ये जुलैअखेर निकाल घोषित होण्याची टक्केवारी ५३ होती. मागील वर्षी निकालाची टक्केवारी ५० होती. पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे,  कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी आणि वित्त अधिकारी डॉ. राजू  हिवसे, अधिकारी उपस्थित होते. 

फेरमूल्यांकनातही आघाडी
निकालानंतर बरेच विद्यार्थी फेरमूल्यांकनासाठी अर्ज करतात. यावर्षी १९ हजारावर विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले. त्यातील ५० टक्के विद्यार्थ्यांना निकाल कळविण्यात आला असल्याचे प्र-कुलगुरूंनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी ६० हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दोन वर्षांत फेरमूल्यांकनात मोठी घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

कधी होणार ई-शुल्क केंद्र?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरातील विद्यार्थ्यांना शुल्काचा भरणा करण्यासाठी ग्रामगीता भवन येथे ई- शुल्क केंद्र स्थापण्यात येणार होते. तशी घोषणा विद्यापीठातर्फे वर्षभराआधी करण्यात आली होती. मात्र, त्या दिशेने विद्यापीठाकडून कुठलेच पाऊल उचलण्यात आले नसल्याचे समजते. 

विद्यापीठाने या शैक्षणिक सत्रापासून ‘गेट वे पेमेंट सिस्टिम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यावर व्यवस्थापन परिषदेनेही शिक्कामोर्तब केले. त्यासाठी ग्रामगीता भवन परिसरात ७५ संगणक संच उपलब्ध करून देत, शुल्क ऑनलाइन भरण्याची सोय करण्यात येणार होती. येथे विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटची सुविधा करण्यात येणार असून, ई-शुल्क पद्धतीने शुल्क जमा करता येणार होते. सध्या सर्व विभागांचे प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी प्रवेशपत्रिका घेणे, नोंदणी करणे, प्रवेश शुल्क भरणे आदी गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसर गाठावे लागते. मात्र, येथे केवळ दोनच काउंटर  असल्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते. विशेष म्हणजे, ई-शुल्क केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने बरीच प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार काही दिवसांतच ही सुविधा होणार असे आश्‍वासन विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. मात्र, विद्यापीठाला आपल्याच आश्‍वासनांचा विसर पडला. मात्र, त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचे दिसून येते. 

Web Title: nagpur news nagpur university