हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे १७ ऑक्‍टोबरपासून आतापर्यंत सुमारे २० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केलेत. यात एमसीएम, एम.ए अंतिम, एम.एससी चौथे सेमिस्टर या निकालांचा समावेश आहे.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे १७ ऑक्‍टोबरपासून आतापर्यंत सुमारे २० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केलेत. यात एमसीएम, एम.ए अंतिम, एम.एससी चौथे सेमिस्टर या निकालांचा समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत विद्यापीठात वेळेवर निकाल न लागणे ही विद्यार्थ्यांची मुख्य समस्या होती. नियमानुसार ४५ दिवसांच्या आत निकाल लागणे आवश्‍यक होते. मात्र, सततच्या निकालातील विलंबामुळे विद्यार्थी त्रस्त होते. मात्र, विद्यापीठाने ‘आयटी रिफॉर्म’ करून काही अभ्यासक्रमांसाठी ‘ऑनस्क्रीन मूल्यांकन सुरू केले. त्याचा फायदा झटपट जाहीर होत असलेल्या निकालांमध्ये झाला. गत उन्हाळी परीक्षांचे बरेच निकाल विद्यापीठाला ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले. सप्टेंबर महिन्यांपर्यत जवळपास सर्वच अभ्यासक्रमांचे निकालही देण्यात आले.

मुंबई विद्यापीठात अद्यापही उन्हाळी परीक्षांचे निकाल लागले नाही हे विशेष.  नागपूर विद्यापीठात हिवाळी परीक्षा ३ ऑक्‍टोबरपासून सुरू झाली. चार टप्प्यामध्ये एकूण १०७८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात  येणार आहेत. यात ३ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला असून, सध्या दुसरा टप्पा सुरू आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील २० अभ्यासक्रमांचे निकाल लावत, विद्यापीठाने मोठे यश मिळविले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने ऑनस्क्रीन मूल्यांकनासह मॅन्युअल मूल्यांकनही सुरू ठेवले आहे. यावर्षीपासून बी.कॉमसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश ऑनस्क्रीन मूल्यांकनात करण्यावर विद्यापीठाचा भर आहे.  

१४ नोव्हेंबरपासून पुढच्या टप्प्याला सुरुवात 
२४ ऑक्‍टोबरपासून सुरू झालेल्या परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यात बीएससी, एमटेक, एमएडसारख्या एकूण १५२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. १४ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या परीक्षांचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये एम.ए, बी.ई, बीटेक, एम.फार्म, एमएससी, बीए  व्होकेशनलसारख्या ४३७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील. यानंतर विद्यापीठावर मूल्यांकनाचे भार वाढणार आहे. त्यामुळे निकालाची गाडी अशीच सुसाट राहणार की तिला ‘ब्रेक’ लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: nagpur news nagpur university education