योजना चांगल्या, विद्यार्थी वंचितच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या योजनेचा समावेश आहे. २००८ साली सुरू केलेल्या या योजनेचा लाभ एकाही विद्यार्थ्याला मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. मात्र, या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या योजनेचा समावेश आहे. २००८ साली सुरू केलेल्या या योजनेचा लाभ एकाही विद्यार्थ्याला मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठात गोंदिया, भंडारा, वर्धा व नागपूर जिल्ह्यातील साडेचारशेहून अधिक महाविद्यालयांचा समावेश होतो. गोंडवाना विद्यापीठ होण्यापूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातून बरेच विद्यार्थी नागपूर विद्यापीठात यायचे. त्यामुळे गडचिरोली, गोंदिया येथील आदिवासींसह सर्वच जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थी परीक्षा शुल्काअभावी परीक्षेस मुकत होते. यावरूनच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खरोखरच खालावली आहे, याची कागदपत्रे विद्यार्थ्यांना सादर करावयाची होती.

पहिल्या वर्षी केवळ दहा अर्ज आले. त्यानंतर आठ वर्षांत विद्यापीठाला एकही अर्ज मिळालेला नाही. विशेष म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. याचे उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वीच परीक्षा भवनातील कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करून विद्यार्थिनीचे शुल्क भरले. मात्र, अशा योजनांचा आधार गरीब विद्यार्थ्यांना न मिळणे शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, अशी कुठली योजना विद्यापीठात आहे, हेसुद्धा विद्यापीठातील अनेकांना  माहिती नाही.

मार्केटिंगचा अभाव
विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी योजनांचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. विद्यापीठ त्यात मागे पडत असल्यामुळे अनेक कल्याणकारी योजना थंडबस्त्यात आहेत. शिवाय त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनाही माहिती मिळत नाही. दुसरीकडे महाविद्यालयांमध्येही योजनाची माहिती पोहोचविली जात नसल्याचे दिसते.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या योजनांप्रती जागरूक राहणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी अर्ज आले नसल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकलेला नाही. मात्र, पुढल्या वर्षी त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. 
- डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Web Title: nagpur news nagpur university plans are good, the students are deprived

टॅग्स