अध्यक्ष, सीईओंमधील शीतयुद्ध चव्हाट्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सुरू असलेले शीत युद्ध चव्हाट्यावर आले. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत त्यांना सहभागी न करणे आणि विदेशवारी प्रकरणात झालेली कारवाईने त्यांच्यातील युद्धाचा भडका उडाला असून परिणामी दोघींनीही पुनर्विनियोजनाच्या फायलींना मंजुरीचे देण्याचे टाळले. 

नागपूर - जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सुरू असलेले शीत युद्ध चव्हाट्यावर आले. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत त्यांना सहभागी न करणे आणि विदेशवारी प्रकरणात झालेली कारवाईने त्यांच्यातील युद्धाचा भडका उडाला असून परिणामी दोघींनीही पुनर्विनियोजनाच्या फायलींना मंजुरीचे देण्याचे टाळले. 

विकासकामावरून गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष सावरकर आणि सीईओ बलकवडे यांच्यात जमत नसल्याची चर्चा आहे. अध्यक्ष सावरकर यांना मिळालेल्या मुदतवाढीनंतर त्यांचा मनमुटाव अधिक वाढला आहे. अध्यक्ष यांच्याकडून प्रस्तावित केलेली कामे नियमांवर बोट ठेवून सीईओंनी करण्यास नकार दिला किंवा परत पाठविले. त्यामुळे अध्यक्ष चांगल्याच नाराज आहे. शाळांसाठी खेळणी साहित्य खरेदीची फाइल सीईओंकडून नामंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता पाणीपुरवठ्याशी संबंधित अनेक कामांना मंजुरी देण्यास त्यांनी नकार दिला. 

आज झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत अध्यक्ष सावरकरांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत बोअरवलेच 1500 पाइप कामात आणून बोअरवेल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शुक्रवारला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार आहे. मागील वर्षीच्या अखर्चित निधीचे पुनर्विनियोजन करण्याच्या फायली महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाकडून अध्यक्षाकडे आल्या. मात्र, त्यांनी या फायलींना मंजुरी देण्यास नकार दिला. तर तिकडे सीईओंनीही पुनर्विनियोजनाच्या फायलींना स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांना मनाई केल्याने अध्यक्षांनी मंजुरी दिलेली शिक्षण विभागाची फाइल परत आली. 

आजच्या सभेत उडणार भडका 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. 18) होणार आहे. अध्यक्ष आणि सीईओ यांच्यातील शीतयुद्धाचा भडका सभेत उडण्याची शक्‍यता आहे. सीईओंकडून विभागप्रमुखांना कोणतेही काम करू देण्यात येत नसल्याने बैठकीत सर्व प्रश्‍नांची उत्तरेही सीईओंकडूनच घेण्याची रणनीती अध्यक्षांनी आखल्याचे दिसते. त्यामुळे उद्याची बैठक चांगलीच हंगामेदार होण्याची चिन्हे आहेत. 

कोट्यवधींचा निधी अखर्चित 
मागील वर्षी खर्च झालेल्या निधीची माहिती कॅफोंकडून सादर करण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार अखर्चित निधीचा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा 50 टक्के लाभार्थ्यांनाही लाभ झाला नाही. प्रशासनाकडून पंचायत समिती स्तरावर निधी वितरित केल्याचे सांगण्यात येत असले तरी तो पाठविण्यात उशीर झाल्यानेच लाभार्थ्यांना लाभ मिळाली नसल्याची माहिती आहे. 

निंबाळकर, विदेशवारीची चर्चा नको? 
लाच प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर यांना एसीबीने अटक केली असून या प्रकरणात कॉंग्रेस सदस्य उपासराव भुते यांचे नाव आले आहे. निंबाळकरांना सत्ताधारी नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधकांकडून हे प्रकरण उचलल्यास कॉंग्रेसही अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. तर, विदेशवारीमध्ये सर्वच कर्मचारी असल्याने याची चर्चा नको, अशीच तयारी सत्ताधारी आणि विरोधकांनी केल्याची माहिती आहे. 

Web Title: nagpur news nagpur zp president CEO