नवीन मतदारांना नावनोंदणीची संधी  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नागपूर - निवडणूक आयोगातर्फे नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन मतदारांना नोंदणी करता येणार असून, १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची संधी दिली आहे. 

नागपूर - निवडणूक आयोगातर्फे नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन मतदारांना नोंदणी करता येणार असून, १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची संधी दिली आहे. 

निवडणूक आयोगाने ३ ऑक्‍टोबरपासून नवीन मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. ही मोहीम ३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदविता येईल. यासोबतच मूळ भारतीय निवासी असलेल्या परदेशातील व्यक्तींना फॉर्म नं. ६-ए भरून नाव नोंदणी करता येईल. 

मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी फॉर्म नं. ७, मतदार यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी फॉर्म नं. ८ तर मतदार यादीतील नाव स्थलांतरित करण्यासाठी फॉर्म नं. ८- एचा वापर करता येईल.

 नावनोंदणीसाठी दोन छायाचित्रे, ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा आवश्‍यक आहे. ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, जन्माचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, दहावी/बारावीची गुणपत्रिका, आधार कार्ड यापैकी कुठलेही एक जोडता येईल. रहिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, वीज बिल, मालमत्ता कर पावती, इन्कम टॅक्‍स पावती, पाणीपट्टी पावती, गॅस कनेक्‍शन, टेलिफोन बिल, बॅंक पासबुक यापैकी कुठलेही एक आवश्‍यक आहे. या मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत नोंद करावी, असे आवाहन मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे. 

ऑनलाइन नोंदणीची सुविधाही
नेटिझन्सला सोयीचे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन नोंदणीची सुविधा आहे. www.nvsp.in या संकेतस्थळावर लॉग इन करून आवश्‍यक तो फॉर्म भरता येईल.

Web Title: nagpur news new voter