डुप्लिकेट नंबरवर लागणार लगाम

डुप्लिकेट नंबरवर लागणार लगाम

नागपूर - शहरात एकाच क्रमांकाची अनेक वाहने धावत असल्याची गंभीर बाब ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर वाहतूक पोलिस विभाग आणि प्रादेशिक वाहन परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली. दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास पथकांचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि आरटीओ या दोन्ही विभागांच्या वतीने संयुक्‍त मोहीम राबविण्यात येणार आहे.  गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेले युवक ओळख लपविण्यासाठी किंवा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सामान्य नागरिकांच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा क्रमांक स्वतःच्या वाहनांवर लावतात. त्यानंतर त्या वाहनातून चोरी, लूटमार, चेन स्नॅचिंग किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात. नरेंद्रनगरातील ताराचंद चरडे यांच्या दुचाकीचा क्रमांक शहरातील वेगवेगळ्या तीन दुचाकी गाड्यांवर आढळून आला. त्या दुचाकींचे ई-चालान चरडे यांच्या पत्त्यावर आल्याने ही गंभीर बाब समोर आली होती. यासंदर्भात अधिक चौकशी करून एका क्रमांकाची अनेक वाहने शहरात फिरत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने सोमवारी प्रकाशित केले होते.

मंगळवारी सकाळी शहर वाहतूक पोलिस दलाचे प्रमुख रवींद्रसिंग परदेशी यांनी लगेच एक पथक तयार केले. यासोबतच परिवहन विभागाशी संपर्क साधून आवश्‍यक पत्रव्यवहार केला. आरटीओ विभागानेही सकारात्मक भूमिका घेत शहरातील सर्व वाहनांचा ‘डेटा’ वाहतूक पोलिस उपायुक्‍तांना दिला. यामध्ये वाहनांचा नोंदणी क्रमांक, वाहनमालकाचे मूळ नाव, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच वाहतूक पोलिसांना मोबाईल ॲपद्वारेच वाहनमालक व वाहनांची माहिती लगेच मिळणार आहे. बनावट नंबर प्लेट वापरणारे त्यामुळे पोलिसांच्या सापळ्यात सापडणार आहेत. या कारवाईबाबत पोलिस आणि आरटीओ विभाग गंभीर आहेत. लवकरच विशेष मोहीम राबवून बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करून कारागृहात रवानगी करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

भूमिका ‘सकाळ’ची
एकाच क्रमांकाची अनेक वाहने शहरात फिरत असल्याच्या ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेऊन वाहतूक पोलिस आणि आरटीओचे अधिकारी-कर्मचारी सतर्क झाले, याचे स्वागत. निरपराध नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी चालान पाठवण्यापूर्वी वाहनाचा ‘मेक’ तपासण्याचा निर्णय स्तुत्य आहे. यासोबतच पोलिसांनी आणि आरटीओच्या पथकांनी आणखी एक गोष्ट केली पाहिजे. कोणतेही वाहन डुप्लिकेट नंबरचे असू शकते. त्यामुळे संशयास्पद वाहनचालकांना थांबवून आणि प्रसंगी नाकाबंदी राबवून गाड्या व कागदपत्रे बारकाईने तपासली पाहिजे. गाडीच्या कागदपत्रांवर लिहिलेला मेक व नंबर या दोन्ही गोष्टींची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची मोहीमच छेडण्याची आवश्‍यकता आहे. निरपराध्यांच्या सुरक्षेसाठी नागपूरकरांकडून या कामीसुद्धा तपास यंत्रणांना सहकार्य मिळेल, याची आम्हाला खात्री वाटते.

कोणत्याही निरपराध वाहनचालकाला नाहक त्रास होऊ नये म्हणून चालान पाठवण्यापूर्वी वाहनांचा ‘मेक’ तपासण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आरटीओ कार्यालयाच्या मदतीने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बोगस क्रमांकाचे वाहन मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल. आरटीओकडून डेटा प्राप्त करण्यात आला आहे. ‘सकाळ’ने घेतलेल्या भूमिकेशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. भविष्यात बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर आळा घालता येईल, असा प्रयत्न आम्ही निश्‍चित करू. 
- रवींद्रसिंग परदेशी  (पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा)

बनावट नंबर प्लेट म्हणजे सुरक्षेला धोका
आरटीओ विभागाकडून एका वाहनाला एकच क्रमांक दिला जातो. त्यामुळे आरटीओ कार्यालयातून चूक होऊ शकत नाही. कुणी जाणीवपूर्वक बनावट क्रमांकाची किंवा इतर कुणाच्या तरी वाहनाच्या नंबरची कॉपी करून तशी नंबरप्लेट वाहनाला लावत असेल, तर तो सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी सतर्क होऊन त्यांचा शोध घ्यावा. आरटीओकडून पोलिस विभागाला सर्वतोपरी मदत केली जाईल. पोलिसांनी केवळ ड्रायव्हिंग लायसन्स न तपासता वाहनांची कागदपत्रे तपासण्याची आवश्‍यकता आहे. आरटीओकडूनही एक पथक कार्यरत आहे. आरटीओकडूनही अशा स्वरूपाच्या कारवाया करण्यात येतात. एकाच क्रमांकाची दोन वाहने आढळल्यास सामान्य नागरिकांनी ‘आरटीओ महाराष्ट्र’ या ॲपद्वारे, ‘ट्रान्सपोर्ट कंम्पलेंट्‌स महाऑनलाइन डॉट जीओव्ही डॉट इन यावर किंवा ०७१२-२५६०७८१ या फोन नंबरवर आरटीओ कार्यालयाला कळवावे. त्यावर तातडीने कारवाई करू. 
-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (नागपूर शहर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com