कांद्याने आणले ग्राहकांच्या डोळ्यात पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागपूर - कांद्याची आवक कमी झाल्याने गेल्या पंधरा दिवसांत कांद्याचे भाव दुपटीने वाढलेत. आवक दिवाळीपर्यंत कमी राहणार असल्याने येत्या काळात भाव असेच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेले काही दिवस स्वस्तात मिळणारा कांदा आता ग्राहकांना रडवणार असल्याची चिन्हे आहेत. 

नागपूर - कांद्याची आवक कमी झाल्याने गेल्या पंधरा दिवसांत कांद्याचे भाव दुपटीने वाढलेत. आवक दिवाळीपर्यंत कमी राहणार असल्याने येत्या काळात भाव असेच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेले काही दिवस स्वस्तात मिळणारा कांदा आता ग्राहकांना रडवणार असल्याची चिन्हे आहेत. 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सात ते आठ रुपये असलेला कांदा आता 25 ते 27 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात हा कांदा 32 ते 35 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. दररोज 35 ते 40 गाड्यांची आवक सुरू असली तरी कांदे महाग झाल्याची धारणा निर्माण झाल्याने भाव वाढले आहेत. यापूर्वीही एवढ्याच गाड्यांची आवक दररोज होत होती. येत्या काळात ही आवक कमीच राहण्याची शक्‍यता आहे. तसेच शेतकऱ्यांकडून व्यापारी कांदा विकत घेतात आणि तो साठवून ठेवतात. अशाप्रकारे कांद्याची कृत्रिम टंचाई व्यापाऱ्याकडून केली गेली असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे. 

मध्यप्रदेशातील कांदा पूर्णपणे बाजारात आला असून, दहा टक्के कांदे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवून ठेवले आहेत. दक्षिण भारतात यंदा काद्यांचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घसरलेल्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवल्याची माहिती आहे. ही स्थिती बराच काळ राहण्याची शक्‍यता नसून, सरकार लवकरच साठेबाजांवर कारवाईचा बडगा उगारतील. त्यामुळे साठवून केलेले कांदा पुन्हा बाजारात येऊन कांद्याचे भावात घट अपेक्षीत आहे. तरी सध्या ग्राहकांना टोमॅटोपाठोपाठ वाढलेल्या दरात कांदा खरेदी करावा लागत असल्याने ग्राहकांचे बजेट बिघडले आहे. 

गुजरातमधील अतिवृष्टी आणि मध्य प्रदेशातील दीड लाख टन कांदा खराब हवामानामुळे सडल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. महाराष्ट्रातील खरीप हंगामातील कांदा बाजारात येईपर्यंत किमान तीन महिने तरी भावात चढउतार अपेक्षित आहे. येथील बाजारात सध्या बिहार, पश्‍चिम बंगालमध्ये कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आवक स्थिर असली तरी मागणी वाढल्याने भाव वधारल्याचे कांदा व्यापारी विश्‍वंभर गुप्ता यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

आकडे बोलतात (घाऊक दर) 
20 जुलै ः सात ते आठ रुपये किलो 
पाच ऑगस्ट ः 25 ते 27 रुपये किलो 

Web Title: nagpur news onion