ब्रॅण्ड असली... माल नकली

केवल जीवनतारे
शनिवार, 20 जानेवारी 2018

नागपूर - चित्रपट, टीव्ही चॅनेल्सवर सौंदर्यप्रसाधनांच्या आकर्षक जाहिराती पाहून आपणही सुंदर आणि आकर्षक दिसावे, अशी इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. ब्यूटी पार्लर, जनरल स्टोअर्स तसेच ऑनलाइन खरेदीतून सौंदर्यप्रसाधने खरेदी केली जातात; परंतु अलीकडे पॅकबंद ब्रॅंड असली; मात्र आतमध्ये माल नकली असण्याची जोखीम वाढत आहे. यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाताना असो वा सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानाची पायरी चढताना जरा सावधानच! जी सौंदर्य प्रसाधने चेहऱ्यावर, त्वचेवर लावली जात आहेत ती बनावट असू शकतात. बनावट सौंदर्य प्रसाधनांमुळे त्वचेवर दुष्परिणाम तर होतोच; परंतु त्वचेचा कर्करोगही होण्याची भीती असते.

घराबाहेर पडताना कपड्यांवर शिंपडली जाणारी सुगंधी द्रव्ये, लिपस्टिक, नेल पॉलिश, त्वचेवर लावण्यात येणारी क्रिम तसेच सुरकुत्या कमी करून चेहऱ्यावर तारुण्य फुलवणाऱ्या प्रसाधनांची बाजारपेठ जागतिक दर्जाची आहे. नववधूला सजवताना तर सौंदर्य प्रसाधनांना प्रचंड महत्त्व आहे. सौंदर्य प्रसाधनाच्या वापरातून व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसत असल्याने ही प्रसाधने गरजेची वस्तू बनली आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावरील व्यक्तीपासून तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडून नये, सदैव तरुण दिसावे, असा ध्यास उराशी बाळगून वयस्कदेखील प्रसाधनांचा वापर करतात. बाजारपेठ वाढल्यामुळे नफेखोरीच्या हेतूने बनावट सौंदर्य प्रसाधनांचाही वापर वाढला आहे; परंतु या प्रसाधनांचा वापर करताना केवळ सौंदर्य बघितले जाते, आरोग्याच्या दृष्टीने त्याकडे बघितले जात नाही, ही खंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. जयेश मुखर्जी यांनी व्यक्त केली.

ग्राहकांनो, सावधानता बाळगा
पार्लर, सलून्समध्ये जाणाऱ्या ग्राहकांना आपल्याकरिता बनावट सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जात आहे, याची कल्पनाही येत नाही. इतक्‍या शिताफीने हे विक्रेते, उत्पादक बनावट सौंदर्य प्रसाधनांचा बाजार मांडत आहेत. सौंदर्य प्रसाधने कितपत सुरक्षित आहेत, याबाबत शहानिशा करावी. बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या दुष्परिणामांची माहिती ग्राहकांनी जाणून घ्यावी. सावधानता बाळगणे हाच बनावट प्रसाधनांवरील पर्याय आहे.

अन्न व औषध विभागाची नजर
अनेक सौंदर्य प्रसाधनांची उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी त्यांच्या सुयोग्य सुरक्षा चाचण्या उत्पादक कंपन्या करतात. मात्र, हे उत्पादन जनरल स्टोअर्स, ब्यूटी पार्लर तसेच इतर ठिकाणी पोचेपर्यंत त्यात भेसळ होण्याची भीती असते. ब्रॅंडेड सौंदर्य प्रसाधनांच्या वेष्टणात बनावट, भेसळयुक्त क्रीम्स आणि उत्पादनांचा समावेश करून विक्री करणारे विक्रेते आणि बनावट उत्पादक यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागानेही मोहीम उघडण्याची गरज आहे. ब्यूटी पार्लर, सलून्ससह विविध मार्केट्‌समध्ये विक्री होणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांवर "एफडीए'ने नजर फिरवावी. नामवंत ब्रॅंडची नक्कल करीत सौंदर्य प्रसाधनांतील डीओ, क्रिम्स, सन स्क्रीन लोशन, फेअरनेस क्रिम, फेसवॉश, लिपस्टिक, कॉम्पॅक्‍ट, नेलपेंट यांच्यासारखी नकली उत्पादने दिसतात. काही महिन्यांपूर्वी नागपुरात औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत चार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. विविध ब्रॅंडच्या सौंदर्य प्रसाधनाच्या रिकाम्या बाटल्या, डबे आणि बॉक्‍स विकत घेतल्यानंतर त्यात भेसळयुक्त सौंदर्यप्रसाधने भरून त्यांची विक्री होत असे. अनेक ब्यूटी पार्लरमध्ये रोझवूड तेल तसेच इतर सौंदर्य प्रसाधनांवर नोंदणी क्रमांक आहे किंवा नाही, याची तपासणी वारंवार व्हावी.

बनावट सौंदर्यप्रसाधने येतात कुठून?
मुंबई आणि दिल्ली, कोलकता यांच्यासारख्या मोठ्या शहरांतून मोठ्या प्रमाणात नकली उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा लहान शहरांमध्ये एजंटांमार्फत होतो, असे "एफडीए'च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मुंबईतील उल्हासनगर आणि दिल्लीतील करोलबाग, कोलकतामधील हावडा परिसरातील काही ठिकाणी कुठल्याही उत्पादनाचे नकली उत्पादन तयार करून मिळतात.

त्वचेची तपासणी करून घेणे महत्त्वाचे
टिटानियम ऑक्‍साइड आणि जस्त ऑक्‍साइड यांच्या अब्जांश कणांचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये होतो; परंतु यात बनावट उत्पादनांची भेसळ केल्यानंतर या प्रसाधनांच्या वापरातून ऍलर्जी होणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे पडणे, मुरूम येणे, डोळे जळजळ करणे, त्वचा जळणे, उन्हाची ऍलर्जी होणे तसेच केसांत कोंडा होणे यांच्यासारखे दुष्परिणाम दिसले की ते सौंदर्यप्रसाधने बनावट आहे असे समजावे, असा सल्ला नागपूरच्या "मेडिकल'च्या त्वचारोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जयेश मुखी यांनी दिला. ते म्हणाले की, तरुण दिसण्यासाठी कलप वापरले जातात. या कलपच्या साहित्यामध्ये फेनिल-अलानाईन, डायमाईन नावाचं द्रव्य असते. त्यांच्या अतिवापरातून चेहरा सुजणे, लाल होणे, डोळ्यांची आग होणे, असे प्रकार होतात. तसेच स्टेराइडचा अतिवापर प्रसाधनांमध्ये होत असल्याने सूर्यकिरणांचा त्वचेवर परिणाम होतो, त्वचा पातळ होते. विशेष असे की, बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या वापराने चेहरा, त्वचा आणि केस खराब झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे एकदातरी प्रसाधनांचा वापर करण्यापूर्वी स्वतःच्या त्वचेची तपासणी करून घ्यावी. त्वचेचा प्रकार ध्यानात घेऊनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करावीत.

Web Title: nagpur news online cosmetics purchasing care