हर्नियाच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नागपूर - सोमवारी क्वॉर्टर स्थित रुग्णालयात हर्नियाची शस्त्रक्रिया करतेवेळी युवकाची प्रकृती खालावली. घाबरलेल्या डॉक्‍टरांनी त्यास केअर रुग्णालयात हलविले. येथील डॉक्‍टरांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यास मृत घोषित केले. मृताच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सीताबर्डी पोलिस ठाण्यावर धडक दिली.

नागपूर - सोमवारी क्वॉर्टर स्थित रुग्णालयात हर्नियाची शस्त्रक्रिया करतेवेळी युवकाची प्रकृती खालावली. घाबरलेल्या डॉक्‍टरांनी त्यास केअर रुग्णालयात हलविले. येथील डॉक्‍टरांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यास मृत घोषित केले. मृताच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सीताबर्डी पोलिस ठाण्यावर धडक दिली.

दीपक जी. ब्राह्मणकर (३८, रा. बुटीबोरी) असे मृताचे नाव आहे. त्यांना पत्नी आशा (३०), आदित्य (७) व तन्नू (४) अशी दोन मुले आहेत. दीपक हे बुटीबोरी परिसरातील संतोष केअरवेल सेक्‍युरिटी सर्विसेस कंपनीत सेक्‍युरिटी सुपरवायझर पदावर कार्यरत होते. त्यांना हर्नियाचा त्रास होता. त्यांनी कंपनीला लागू असलेल्या सोमवारी क्वॉर्टर स्थित विमा रुग्नालयातील डॉक्‍टरला २७ ऑक्‍टोबरला दाखविले. डॉक्‍टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले.

सोमवारी सकाळी डॉक्‍टरांनी त्यांना भरती केले. मंगळवारी सकाळी शस्त्रक्रियेदरम्यान दीपक यांची प्रकृती खालावली. डॉक्‍टर घाबरले आणि दीपक यांना केअर रुग्णालयात हलविले. शस्त्रक्रियेत हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे कारण डॉक्‍टरांनी पुढे केले. इकडे केअर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी उपचार सुरू केला. दुपारी तीनच्या सुमारास डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दीपक चालत रुग्णालयात आले असताना अचानक मृत्यू झाल्याने पत्नी आशा यांनी विमा रुग्णालयातील डॉक्‍टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. त्यांनी नातेवाइकांसह सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून विमा रुग्णालयातील दोषी डॉक्‍टरांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी वैद्यकीय समिती गठित करून चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

मृत्यूच्या तारखेत घोळ
दीपक यांचा मंगळवारी (१६ जानेवारी २०१८) दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला असताना केअर हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी १६ जानेवारी २०१६ रोजी मृत्यू झाल्याचे पत्र सीताबर्डी पोलिसांना सादर केले. यावरून विमा रुग्णालयासह केअर रुग्णालयातील डॉक्‍टरांचा हलगर्जीपणा समोर आल्याने सीताबर्डी पोलिस संबंधित डॉक्‍टरांविरुद्ध कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: nagpur news patient death during hernia surgery