पुढाऱ्यांच्या हातातील अण्वस्त्र जास्त धोकादायक - पीटर कुझनिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नागपूर - सध्या जागतिक स्तरावर अत्यंत भीतिदायक वातावरण निर्माण झाले असून, तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. राजकीय स्तरावर ही परिस्थिती हाताळण्याचे सामर्थ्य आहे. मात्र, दोन्ही बाजूने तसे प्रयत्न होताना दिसून येत नाही. सध्याची परिस्थिती बघता आंतकवाद्यांपेक्षा राजकारण्यांच्या हातात अण्वस्त्र जास्त धोकादायक असल्याचे मत अमेरिका विद्यापीठातील न्युक्‍लीअर स्टडीज इन्स्टिट्यूटचे संचालक आणि इतिहासाचे प्रोफेसर पीटर  कुझनिक यांनी व्यक्त केले. 

श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकारांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पीटर कुझनिक म्हणाले, जगात ९३ टक्के अण्वस्त्र साठा रशिया आणि अमेरिका या दोन देशांकडे आहे. प्रत्येक देश आपल्या रक्षणासाठी त्यावर संशोधन वा चाचण्या कमी-अधिक प्रमाणात घेत आहे. मात्र, आताच्या परिस्थितीत त्याचा वापर झाल्यास हिरोशिमा आणि नागासाकी या शहरातील विनाशापेक्षा कितीतरी पटीने विनाश घडेल. त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग आणि इतर देशांवरही दिसून येणार आहे. त्यामुळे अण्वस्त्रांचा वापर थांबविणे आवश्‍यक आहे. 

त्यासाठी फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन अमेरिका यांच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक पत्र पाठविले होते. मात्र,  त्या पत्राचे उत्तर अद्याप आलेले नाही. विशेष म्हणजे त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. सोशल मीडियाचा आधार घेत निवडून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बऱ्याच प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. त्यासाठी निदर्शनाचे आयोजन करण्यात  येत आहे. याचे कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मानसिक रुग्ण असून ते अमेरिकेला पुन्हा एकदा युद्धाचा खाईत ढकलण्याच्या तयारीत आहे. 

आपल्या विचित्र स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीत येतात. अशा व्यक्‍तीच्या हाती महासत्तेची सुरक्षा यंत्रणा ही बाब धोकादायक ठरणारी आहे. अशा वातावरणात अमेरिका आणि त्यांच्या शत्रू राष्ट्रांमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधाविषयी त्यांनी बोलण्याचे टाळले. मात्र, युद्ध होणेही धोकादायक असल्याचे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नान्सी कुझनिक, जोसेफ राव उपस्थित होते.

Web Title: nagpur news peter kuznick talking