सावनेर, जरीपटक्‍यातील पेट्रोल पंपांवर छापे

सावनेर, जरीपटक्‍यातील पेट्रोल पंपांवर छापे

नागपूर - पेट्रोल पंपामध्ये पल्सर नावाची मायक्रोचिप लावून ‘मापात पाप’ करणाऱ्या जरीपटक्‍यातील श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंप आणि सावनेरमधील भाजपचे नेते दादाराव मंगले यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यादरम्यान पेट्रोल पंपावरील दोन मशीनमध्ये ‘कंची’ मारण्याची व्यवस्था पंपमालकाने केली होती. त्यामुळे दोन मशीनला सील करण्यात आले. 

जरीपटक्‍यात विनोद आरमरकर याच्या मालकीचा श्री समर्थ योगीराज पेट्रोलपंप आहे. येथे चार पेटोल वेंडिंग मशीन आहे. ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने दुपारी छापा घातला. मशीनची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन मशीनमधून पाच लिटर पेट्रोल झिरो सेट केल्यानंतर काढण्यात आले. एका मशीनमधून पाच लिटर पेट्रोल काढल्यानंतर ते केवळ ४ लिटर ६०० मिलि पेट्रोल बाहेर पडले. त्यामुळे दोन्ही पेट्रोल वेंडिंग मशीनमधून १० लिटर पेट्रोलवर ८०० मिलि पेट्रोल कमी भरले. पेट्रोल वेंडिंग मशिनची तपासणी केली असता मशीनमधून पल्सर नावाची विशिष्ट मायक्रोचिप बसवलेली आढळली. दोन्ही मशीनवर सीलबंदची कारवाई करण्यात आली. कारवाई अविराज कुराडे, समीर अहिरराव, श्रीशैल चिवडशेट्टी, आनंदा भीलारे, जाधव, अबुतालिब शेख, कांबळे, गायकवाड, संजय दळवी यांनी केली.

म्हणूनच बॉटलमध्ये पेट्रोल नाही
पंपचालकांचे पाप उघडकीस येऊ नये म्हणून ग्राहकांना पेट्रोल बाटलीमध्ये देण्यात येत नाही. ग्राहकांची गाडी बंद पडल्यानंतर कितीही विनवण्या केल्या तरी पेट्रोल बॉटलमध्ये देण्यास पंप कर्मचारी टाळाटाळ करतात. बॉटलमध्ये लिटरने पेट्रोल न देता रुपयांमध्ये पेट्रोल घेण्याचा आग्रह कर्मचारी करतात. 

सावनेरमध्येही पंपावर कारवाई 
सावनेरमधील भाजपचे मोठे नेते दादाराव मंगले यांचा नागपूर-सावनेर महामार्गावर धनश्री ऑटो सर्व्हिसेस नावाने पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी एक वाजता ठाणे क्राइम ब्रॅंचने छापा घातला. पोलिसांनी तीन मशनमधून पल्सर चिप आणि कंट्रोल पॅनल जप्त केले. यापूर्वी नागपूरमधील नवनीतसिंग तुली यांच्याही मानकापुरातील पेट्रोलपंपावर कारवाई करण्यात आली.

अशी केली पंपचालकांची कोंडी
राज्यातील जवळपास ९५ टक्‍के पेट्रोल पंपांवर पेट्रोल चोरी करण्यासाठी पल्सर चिप लावण्यात आलेली आहे. याचा मास्टरमाइंड विवेक शेट्ये असून, त्याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्याने दिलेल्या यादीत राज्यभरातील ४००० पेट्रोल पंपांचा समावेश आहे. या चिपद्वारे प्रत्येक लिटरला ४० ते ८० एमएल पेट्रोल चोरी करता येते. पेट्रोल मशीनला सील असते. ते सील तोडणे गुन्हा आहे आणि वैधमापन विभागाने नव्याने सील देणे बंद केले आहे. त्यामुळे पल्सर चिप काढण्याची मनाची तयारी असूनही काढू शकत नाही. त्यामुळे अशा प्रत्येक पंपचालकांवर गुन्हे दाखल होणे निश्‍चित असल्याचे पीआय ठाकरे म्हणाले.

१२ पथके गठित
राज्यभरात ठाणे गुन्हे शाखेतर्फे पेट्रोल चोरी करणाऱ्या पंपांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. एकूण १२ पथके पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. यापैकी ६ पथके विदर्भामध्ये कारवाई करीत आहेत. यामध्ये २५ पोलिस अधिकारी आणि १०० कर्मचारी आहेत. अजून तीन ते चार दिवस शहरात ठाणे पथक राहणार असून आणखी काही पेट्रोल पंपांवर छापे पडण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com