'दोषी संचालकावर कारवाई करा' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - काही पेट्रोलपंप संचालकांकडून होत असलेला इंधन चोरीचा प्रकार दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया आणि सचिव प्रणय पराते यांनी आज पत्रकार परिषदेत केली. चुकीच्या व्यक्तीला असोसिएशन समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

नागपूर - काही पेट्रोलपंप संचालकांकडून होत असलेला इंधन चोरीचा प्रकार दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया आणि सचिव प्रणय पराते यांनी आज पत्रकार परिषदेत केली. चुकीच्या व्यक्तीला असोसिएशन समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपावर चिप लावून इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सूत्रधारांना ठाणे आणि पुणे येथे अटक केली. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राज्य शासनाने पेट्रोलपंपावर कारवाईसाठी विशेष तपास पथक तयार केले. राज्यभर ७५ पेट्रोलपंपावर छापे टाकण्यात आलेत. त्यातील १५ ते २० पंपावरच चिप लावल्याचे आढळून आले आहे.  काही ठिकाणी संशय आल्याने तपासणी केली जात आहे. काहीच त्रुटी नसल्या तरीही ते पेट्रोलपंप बंद करण्यात येत आहे.  हे अन्यायकारक आहे. माध्यमातून ९० ते ९५ टक्के पेट्रोलपंपावर चिप लावण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित होत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, दररोज ग्राहक अनावश्‍यक वाद घालू लागले असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 

या प्रकारासाठी ऑइल कंपन्याही जबाबदार नाहीत. कारण पल्सर कार्ड मशीनच्या आत असून त्यावर वजन माप विभागाचे सील असते. पेट्रोलपंप संचालकांच्या मंजुरीशिवाय ही चिप लावता येत नसल्याने ते जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ऑइल कंपन्यांनी जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंपाची तपासणी करावी आणि त्यानंतरच पेट्रोलपंप पुन्हा सुरू करावेत. हे ग्राहकांच्या आणि पेट्रोलपंप चालकांच्या हिताचे असल्याचे स्पष्ट केले.  

पेट्रोलपंपावर लावलेल्या मशीनसोबत छेडछाड करणाऱ्याची डीलरशिप रद्द करावी. मात्र, इतरांना नाहक त्रास देऊ नये. तसेच मशीनची तीन महिन्यानंतर कंपन्यांनी नियमित तपासणी करावी. डिलरची विक्री वाढल्यानंतर डीलरला जुन्याच मशीन पाठविण्यात येतात, त्या पाठवू नयेत. नवीन मशीन पाठविण्यात याव्यात, अशी मागणीही संयुक्तरीत्या केली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विलास साल्पेकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, सहसचिव अमित गुप्ता उपस्थित होते.

Web Title: nagpur news petrol pump chip scam