फ्रेण्ड्‌स कॉलनीतही चिप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - गिट्टीखदानमधील फ्रेण्ड्‌स कॉलनीत असलेल्या एस. एस. पेट्रोल पंपावर ठाणे क्राइम ब्रॅंचने छापा घातला. येथील मशीनमध्येसुद्धा पल्सर चिप आढळली. तसेच कंट्रोल कार्डशीसुद्धा छेडछाड केली होती. यामुळे तीन मशीन ‘सील’ केल्या. हा पेट्रोल पंप रमेश एस. वानखडे यांच्या मालकीचा आहे.

नागपूर - गिट्टीखदानमधील फ्रेण्ड्‌स कॉलनीत असलेल्या एस. एस. पेट्रोल पंपावर ठाणे क्राइम ब्रॅंचने छापा घातला. येथील मशीनमध्येसुद्धा पल्सर चिप आढळली. तसेच कंट्रोल कार्डशीसुद्धा छेडछाड केली होती. यामुळे तीन मशीन ‘सील’ केल्या. हा पेट्रोल पंप रमेश एस. वानखडे यांच्या मालकीचा आहे.

काही वर्षांपासून फ्रेण्ड्‌स कॉलनीत रमेश वानखडे यांचा एस. एस. नावाने पेट्रोल पंप आहे. येथे चार पेट्रोल वेंडिंग  मशीन असून, तीन मशीनमध्ये ‘पल्सर’ मायक्रोचिप लावली होती. तसेच रमेश वानखडेने पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये असलेल्या कंट्रोल कार्डमध्येही सेटिंग केली होती. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल कमी पडल्याचे ओळखू येत नाही. ठाणे पोलिसांनी पकडलेल्या विवेक शेट्येने रमेश वानखेडे यांनी पल्सर चिप विकत घेतल्याचे बयाण दिले. त्यामुळे सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने पेट्रोल पंपावर छापा घातला असता पेट्रोल पंप बंद होता. यावेळी तिन्ही मशीनमध्ये पल्सर चिप आढळली. त्यामुळे पोलिसांनी मशीन सील केली. ही कारवाई अधिकारी नितीन ठाकरे, एपीआय अविराज कुराडे, समीर अहिरराव, श्रीशैल चिवडशेट्‌, हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, अबुतालिब शेख, विक्रांत कांबळे, शिवाजी गायकवाड, संजय दळवी यांनी केली.

म्हणून बंद होता पंप
बिहारनंतर महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांवर पोलिसांनी छापे घालून मशीन सील करण्याच्या कारवाईचा धडाका सुरू केला. रमेश वानखडेनेही पेट्रोल पंपात पल्सर चिपचा वापर केला होता. कारवाईच्या भीतीपोटी वानखडेने दीड महिन्यापासून पंप बंद केला होता, अशी चर्चा शहरभर होती.

कारवाई होणारच
कारवाईच्या भीतीपोटी अनेक पेट्रोल पंपचालकांनी कोणतेही कारण दाखवून पंप बंद ठेवले. त्यांनी पेट्रोलची उचल करणे बंद केले. यामुळे कारवाईतून वाचता येईल, अशी भाबडी आशा पंपचालकांना होती. मात्र, पंप बंद असो वा चालू ज्यांनी पल्सर चिप लावली आहे, त्यांच्यावर कारवाई निश्‍चितच होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

पंपावर लागू शकते आग?
पोलिसांच्या कारवाईतून सुटण्यासाठी काही पेट्रोल पंप मालक वेगवेगळ्या क्‍लृप्त्या शोधून काढत आहेत. यामध्ये पेट्रोल पंपाची गुंडांनी तोडफोड केली, असा बनाव पंपमालक करू शकतात. तसेच पेट्रोल पंप बंद पाडून पेट्रोल नसताना पल्सर चिप असलेल्या मशीनला आग लावू शकतात, अशी भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

Web Title: nagpur news petrol pump chip scam