मद्यधुंद पोलिसाला चोप  

मद्यधुंद पोलिसाला चोप  

नागपूर - व्हीएनआयटी कॉलेजच्या गेटजवळ एका पोलिस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत हातठेलाचालकाला दमदाटी केली. त्याने हातठेला उलटून टाकल्यामुळे संतप्त हातठेलाचालक आणि नागरिकांनी त्याला चांगलेच चोपले. बजाजनगर पोलिस त्याला ठाण्यात घेऊन जात असताना त्याने त्यांच्याच हातावर तुरी देऊन पळ काढल्याची माहिती सूत्राने दिली. भूषण भरकर असे पोलिस शिपायाचे नाव आहे. 

बजाजनगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई भूषण भरकर त्यांचेच कनिष्ठ सहकारी आहेत. भरकर शंकरनगर बिटमध्ये चार्ली ड्युटीवर आहे. त्याची आज दुपारी ३ वाजतापर्यंत ड्युटी होती. मात्र, तो सायंकाळपर्यंत मित्रासोबत मद्य प्राशन करीत होता. घरी परतत असताना त्याने व्हीएनआयटी गेटजवळ एक हातठेलाचालकाला दमदाटी केली. त्यामुळे दोघांत वाद झाला. पोलिस शिपायाने त्याचा हातठेला उलटून टाकला. हातठेल्यावर मका भाजण्यासाठी असलेले निखारे रस्त्यावर पडले. त्यामुळे काही नागरिकांचे पाय जळाले. 

त्यामुळे नागरिकांसह हातठेलाचालकाने पोलिस कर्मचाऱ्याला मारण्यास सुरुवात केली. त्याने मद्य प्राशन केल्यामुळे नागरिकांनी त्याला चांगलेच चोपले. एका नागरिकाने या प्रकाराची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. कंट्रोलमधून बजाजनगर पोलिसांना कॉल करण्यात आला. एक पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी भूषण भरकरला ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणत असतानाच त्याने ठाण्यासमोरून पळ काढला. या प्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची नोंद किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिस उपायुक्‍त श्रीमती पाटील यांनी या घटनेबाबत अहवाल मागितला आहे. त्यामुळे पोलिस शिपायावर कारवाई निश्‍चित असल्याचे कळते.

पोलिसांचा वचक हवा
परिमंडळ एकमध्ये अनेक हातठेलाचालक, चहाचे ठेले तसेच नाश्‍ता सेंटर चालकांची रेलचेल आहे. बजाजनगर, प्रतापनगर, सीताबर्डी पोलिसांचा वचक नसल्यामुळे हातठेलाचालक वर्दीवर हात घालण्यास घाबरत नाहीत. पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत हातठेलाचालकांची मजल गेली आहे. चहावाल्याकडून पोलिस हप्ता घेतात, अशीही ओरड नेहमी होत असते.

पोलिस कारवाई टाळण्यासाठी पलायन
पोलिस शिपाई भूषण हे मद्य प्राशन करून होते. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यासमोरून पळ काढल्याची माहिती आहे. मात्र, ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले, त्यांच्याही भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. पोलिस शिपाई पळाला की त्याला पळण्याची संधी देण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com