पोलिसाने केला बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

असा आला प्रकार उघडकीस 
रात्री नऊदरम्यान कामावर गेलेला महिलेचा पती घरी आला. तेव्हा नुकताच रवी घराबाहेर पडताना त्याला दिसला. पोलिस कर्मचारी घरातून निघाल्यामुळे संशय आला. घरात गेला तेव्हा पत्नीची अवस्था पाहून प्रकार लक्षात आला. घडलेली घटना पतीला सांगितली. दोघेही सोनेगाव पोलिस ठाण्यात गेले. रवीच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. 

नागपूर - शहर पोलिस दलात कार्यरत पोलिस शिपायाने एका वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्‍यावर पिस्तूल ठेवून विवाहितेवर बलात्कार केला. तिला पट्ट्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी पोलिस कर्मचारी रवी ओंकार जाधव (सोनेगाव- म्हाडा कॉलनी, खापरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताबडतोब अटक केली. या घटनेमुळे पोलिस विभागाची पुन्हा प्रतिमा मलीन झाली.  या घटनेची संपूर्ण पोलिस दलात चर्चा आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी जाधव हा पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. तो २०१४ बॅचचा पोलिस कर्मचारी असून, सध्या शहरातील नामांकित व्यक्‍तीकडे गनमॅन (गार्ड) आहे. खापरीत पीडित महिला पती व एका वर्षाच्या चिमुकलीसह राहते. महिलेचे पती मिहानमध्ये चालक असून महिला गृहिणी आहे. पोलिस मुख्यालयात जाताना महिलेचे घर असल्याने दोघांची ओळख झाली. काही दिवसांत दोघांमध्ये मैत्री झाली. महिलेचा पती रोज सकाळीच ड्यूटीवर जात असल्यामुळे रवी तिच्या घरी जात होता. घरी एकटीच असल्याचे हेरून शनिवारी रात्री आठला रवी खाकी वर्दीवरच महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेचा प्रतिकार बघून त्याने वर्दीवरील पिस्तूल काढली आणि महिलेच्या एक वर्ष वय असलेल्या चिमुकलीच्या डोक्‍यावर ठेवली. शारीरिक संबंधास नकार दिल्यास गोळी घालण्याची धमकी दिली. त्यामुळे बाळाच्या जीवाच्या भीतीमुळे नाईलाजाने असहाय पीडिता हतबल झाली. नराधम पोलिस कर्मचाऱ्याने बलात्कार केला. तिने पती घरी आल्यानंतर प्रकार सांगणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे रवीने कमरेचा पट्‌टा काढून महिलेला झोडपले. कुणालाही सांगितल्यास गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी संबंधित पोलिसांनी दिली. 

Web Title: nagpur news police rape case crime