पॉलिटेक्निकच्या 25 हजार जागांसाठी केवळ 1000 अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

असे आहे वेळापत्रक 

 • ऑनलाईन अर्ज करणे : 19 ते 30 जून 
 • कागदपत्रांची पडताळणी : 19 ते 30 जून 
 • तात्पुरती गुणवत्ता यादी : 1 जुलै 
 • आक्षेप नोंदविणे : 2 ते 4 जुलै 
 • अंतिम गुणवत्ता यादी : 5 जुलै 
 • पसंतीक्रमाचा अर्ज भरणे : 7 ते 11 जुलै 
 • तात्पुरती प्रवेश यादी : 13 जुलै 
 • दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरणे : 20 ते 23 जुलै 
 • तात्पुरती प्रवेश यादी : 24 जुलै 
 • तिसऱ्या फेरीसाठी अर्ज भरणे : 30 जुलै ते 1 ऑगस्ट 
 • तात्पुरती प्रवेश यादी : 3 ऑगस्ट 
 • समुपदेशन प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट 
 • अतिरिक्त फेरी : 12 व 13 ऑगस्ट 
 • तात्पुरती प्रवेश यादी : 14 ऑगस्ट

नागपूर : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 'पॉलिटेक्‍निक' प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लांबली होती. 19 जूनपासून 'पॉलिटेक्‍निक' प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश नोंदणीला शेवटचे तीन दिवस असताना नागपूर विभागातील 25 हजार 691 जागांसाठी केवळ एक हजार 39 विद्यार्थ्यांनी सोमवारपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी केली. त्यामुळे 'पॉलिटेक्‍निक'च्या भविष्यावर चिंता करण्याची वेळ आली आहे. 

दहावीनंतर 'पॉलिटेक्‍निक'च्या पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन करिअरचा मार्ग शोधणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पदविका अभ्यासक्रमांत प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत पद्धतीने राबविण्यता येणार आहे. केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून तसेच संस्थास्तरावरील प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांवर प्रवेशासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. शनिवारी शाळांना दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर दोन दिवस सुटी आली. उद्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार असून, प्रवेशाला सुरुवात होईल. तरीही प्रवेशाची आकडेवारी फारच वाढेल, अशी शक्‍यता कमी आहे. तंत्रशिक्षण विभागाने प्रवेशाचे वेळापत्रक आखले असले तरी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे.

'पॉलिटेक्‍निक'च्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षीच उशीर होत असल्याने रिक्त जागांचे संकट वाढत असल्याचा आरोप काही संस्थाचालकांनी केला. नागपूर विभागात यंदा 25 हजार 691 जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. मात्र, सध्या केवळ एक हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहिली असता दरवर्षी 60 टक्के जागा रिक्त आहेत. यंदा परिस्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे अनेक पॉलिटेक्‍निक' महाविद्यालयांवर बंद होण्याची वेळ येणार आहे. 

  Web Title: nagpur news polytechnic admissions technical education career