खड्डे बुजविण्यात 12 कोटींचा घोटाळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - शहरातील खड्डे बुजविण्याच्या नावावर जेटपॅचर मशीन कंत्राटदारांच्या घशात महापालिकेकडून नागरिकांचा पैसा ओतण्याचे काम सुरू असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट आहे. गेल्या साडेतीन वर्षात जेटपॅचर मशीन कंपनीने 12 हजार 139 खड्ड्यांसाठी महापालिकेकडून 14 कोटी 45 लाख रुपये उकळले. अर्थात एका खड्ड्यासाठी या कंत्राटदार कंपनीने 11 हजार 903 रुपये घेतले. त्याचवेळी महापालिकेच्या हॉट मिक्‍स विभागाला एक खड्डा बुजविण्यासाठी केवळ 1981 रुपये खर्च आला. जेटपॅचरच्या कंत्राटदाराला साडेतीन वर्षात 12 कोटी रुपये अधिक देण्यात आले असून हा घोटाळा अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याच्या आरोपांनाही दुजोरा मिळाला. 

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेचा हॉट मिक्‍स विभाग कार्यरत आहे. मात्र, जेटपॅचर मशीननेही खड्डे बुजविण्यात येत आहे. जेटपॅचर मशीन कंत्राटदार महापालिकेकडून पैसा उकळत असून खड्डा बुजविल्यानंतर तत्काळ तो जैसे थे होत असल्याचा आरोप शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते असताना सभागृहात आरोप केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना महापालिकेच्या हॉट मिक्‍स विभागाने दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीतही ही कंपनी पैसा उकळत असल्याचे स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा भ्रष्टाचार शक्‍य नसल्याचेही दिसून येत आहे. माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार 2014-15 ते 2017-18 या साडेतीन वर्षांच्या कालखंडात महापालिकेने जेटपॅचरद्वारे 12 हजार 139 खड्डे बुजविले. यासाठी जेटपॅचर कंपनीला 14 कोटी 45 लाख रुपये देण्यात आले. अर्थात एका खड्ड्यासाठी या कंपनीला 11 हजार 903 रुपये देण्यात आले. याच साडेतीन वर्षांत महापालिकेच्या हॉट मिक्‍स विभागाने 36 हजार 78 खड्डे बुजविले. यासाठी महापालिकेला 7 कोटी 15 लाख रुपये खर्च आला. महापालिकेला एक खड्डा बुजविण्यासाठी 1981 रुपये खर्च येत असताना जेटपॅचरने खड्डा बुजविण्यासाठी कंत्राटदाराला 11 हजार 903 रुपये कसे काय देण्यात आले? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. जेटपॅचर कंत्राटदाराला एका खड्ड्यामागे 9922 रुपये अतिरिक्त देण्यात आले असून अशाप्रकारे 12139 खड्ड्यांसाठी 12 कोटी 4 लाख 43 हजार रुपये अधिक देण्यात आले. विशेष महापालिकेच्या हॉट मिक्‍स विभागात तज्ज्ञ अभियंते, वित्त विभागात अर्थतज्ज्ञ असतानाही ही चूक कुणाच्याही लक्षात कशी आली नाही? असा सवाल यानिमित्त उपस्थित झाला आहे. नागरिक कररूपाने महापालिकडे पैसा भरतो, नागरिकांचा हा पैसा खासगी कंत्राटदार कंपनीच्या घशात ओतण्यासाठीच आहे काय? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कुणी किती खड्डे बुजविले ? 
2014-15 ते 2017-18 या काळात जेटपॅचरने 12 हजार 139 खड्डे बुजविले. यासाठी 14 कोटी 45 लाख रुपये देण्यात आले. याच काळात महापालिकेने 36 हजार 78 खड्डे बुजविले. यासाठी महापालिकेला 7 कोटी 15 लाख रुपये खर्च आला. जेटपॅचर कंत्राटदाराला एका खड्ड्यासाठी 11 हजार 903 रुपये तर महापालिकेला एका खड्ड्यासाठी 1981 रुपये खर्च आल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. 

Web Title: nagpur news potholes